टीव्ही सेंटर परिसरामध्ये महापालिकेचा जेसीबी फोडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

औरंगाबाद - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेचा जागांचा शोध सुरूच असून, मंगळवारी (ता.१३) रात्री टीव्ही सेंटर भागात स्वामी विवेकानंद उद्यानाच्या जागेत कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी प्रचंड विरोध करत महापालिकेच्या जेसीबीवर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारासही भला मोठा खड्डा बुजवण्याचे काम सुरू होते. 

औरंगाबाद - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेचा जागांचा शोध सुरूच असून, मंगळवारी (ता.१३) रात्री टीव्ही सेंटर भागात स्वामी विवेकानंद उद्यानाच्या जागेत कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी प्रचंड विरोध करत महापालिकेच्या जेसीबीवर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारासही भला मोठा खड्डा बुजवण्याचे काम सुरू होते. 

शहराच्या कचराकोंडीनंतर महापालिकेने कचऱ्याचे ओला-सुका असे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात जागांचा शोध सुरू आहे. टीव्ही सेंटर परिसरात स्वामी विवेकानंद उद्यानाची २२ एकर जागा आहे. या जागेत महापालिकेने वृक्षारोपण केले असून, गेल्या तीन दिवसांपासून कचरा टाकण्यासाठी ही जागा महापालिका अधिकाऱ्यांनी हेरून ठेवली होती. दोन दिवसांपासून या जागेत सुमारे २० ट्रक कचरा महापालिकेने खड्ड्यात टाकून पुरला आहे. त्या शेजारीच पुन्हा भलामोठा खड्डा खोदण्याचे काम सोमवारी (ता.१२) रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा जेसीबी घेऊन महापालिका अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी आले. त्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेतली. माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी खड्डा खोदण्यास विरोध केला. याठिकाणी दूरदर्शनचे कार्यालय आहे. शेजारीच ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय आहे. मोठी नागरी वसाहत असल्याने दुर्गंधीचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथे कचरा टाकू दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त जमावाने जेसीबीवर दगडफेक सुरू केली. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रजापती यांनी मध्यस्थी केली. जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने शेवटी खड्डा बुजवण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत खड्डा बुजविण्याचे काम सुरू होते. 

उद्यानातील झाडांची कत्तल
कचरा टाकण्यासाठी महापालिकेनेच उद्यानातील तीस ते चाळीस झाडांची कत्तल केल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. विनापरवानगी झाड तोडल्यानंतर सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल केले जातात. आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जमावाने केली आहे. 

कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी स्वामी विवेकानंद उद्यानाच्या जागेत खड्डे खोदले जात होते. मात्र, नागरिकांनी मोठा विरोध करीत हे काम रोखले. परिणामी खोदलेला खड्डा बुजविण्याचे काम मध्यरात्रीनंतरही सुरूच ठेवले आहे.
- दीपक जोशी, वॉर्ड अधिकारी

Web Title: aurangabad news amc JCB