शहरात साडेचार कोटींचे पॅचवर्क, अहिंसानगरच्या हाती भोपळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

औरंगाबाद - खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने साडेचार कोटींचा खर्च केला असला तरी जालना रस्त्याला पर्यायी असलेल्या अहिंसानगरातील रस्त्याच्या हाती यातून भोपळाच लागला आहे. या रस्त्याचे तीन थर वाहून गेले असून, रस्त्याची सोलिंग वर आल्याने धुळीचे लोट उठत आहेत. 

औरंगाबाद - खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने साडेचार कोटींचा खर्च केला असला तरी जालना रस्त्याला पर्यायी असलेल्या अहिंसानगरातील रस्त्याच्या हाती यातून भोपळाच लागला आहे. या रस्त्याचे तीन थर वाहून गेले असून, रस्त्याची सोलिंग वर आल्याने धुळीचे लोट उठत आहेत. 

जालना रस्त्याला पर्यायी म्हणून सध्या वापरात असलेल्या अहिंसानगरातील मुख्य रस्त्याला पॅचवर्कमधून दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे या रस्त्याची धूळधाण झाली असून, अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. रस्त्याने होणारी जड वाहतूक हे खड्डे अधिक रुंद आणि खोल करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. नूपुर अपार्टमेंट ते नावंदर दवाखानादरम्यानच्या रस्त्याची चाळणी झाल्याने परिसरातील नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. माती आणि दगडी सोलिंग वर आल्याने वाहने खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कैलासनगर भागात असलेल्या वजन काट्यावर येणाऱ्या जड वाहनांचा राबता येथून असल्याने उडणारी धूळ परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यालगत असलेल्या जलनिस्सारण यंत्रणेतही माती कोंबून ती बंद केली गेल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहिले. ज्याचा मोठा फटका या रस्त्याला बसला होता. यात या रस्त्याचे तीन थर वाहून गेले.  

माजी उपमहापौर म्हणतात... 
या वॉर्डातील रहिवासी आणि माजी उपमहापौर प्रशांत देसरडा म्हणतात, की रस्त्याचे डांबरीकरण प्रस्तावित आहे. पॅचवर्कचे काम करून पाच लाखांची रक्कम खर्च करण्याऐवजी डांबरीकरण झाल्यावर सगळे प्रश्‍न मिटतील. हे काम सुरू होण्यासाठी महिनाभर लागणार आहे. तोपर्यंत कोणता तात्पुरता उपाय करणार, यावर विचारणा केली असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.

Web Title: aurangabad news amc Potholes