तुम्ही महापालिकेचे  मालक झाले का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - ऐन सणासुदीच्या काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, नागरिक त्रस्त आहेत. पहाटेपासून नागरिकांच्या तक्रारींना मला तोंड द्यावे लागत आहे. पदाधिकारी, नगरसेवकांना साधी माहिती कळवीत नाही, तुम्ही मालक झाले आहात का? इथे मी जेवायला बसलोय का? अशा शब्दांत महापौर भगवान घडामोडे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांची खरडपट्टी काढली. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना त्यांनी या वेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिल्या.

औरंगाबाद - ऐन सणासुदीच्या काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, नागरिक त्रस्त आहेत. पहाटेपासून नागरिकांच्या तक्रारींना मला तोंड द्यावे लागत आहे. पदाधिकारी, नगरसेवकांना साधी माहिती कळवीत नाही, तुम्ही मालक झाले आहात का? इथे मी जेवायला बसलोय का? अशा शब्दांत महापौर भगवान घडामोडे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांची खरडपट्टी काढली. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना त्यांनी या वेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिल्या.

शहरातील पाणीपुरवठा गेल्या महिनाभरापासून विस्कळित झाला आहे. वारंवार खंडित होणारी वीज, पाइपलाइन फुटणे यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने श्री. घडामोडे यांनी आढावा घेण्यासाठी महापौर दालनात सोमवारी (ता. २८) बैठक घेतली. पाणीपुरवठा विस्कळित झाल्यानंतर प्रशासनातर्फे माहिती कळविण्यात येत नसल्याने महापौर या वेळी संतप्त झाले. पहाटे पाचपासून नागरिकांच्या तक्रारींना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. त्यांना मी काय उत्तर देऊ, तुम्ही मला माहिती कळविली का? असा प्रश्‍न करताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. आयुक्तांना माहिती दिली होती, यापुढे आपल्याला देखील माहिती कळविण्यात येईल, अशी ग्वाही देऊन सरताजसिंग यांनी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर आणखीच भडकले. तुम्ही महापालिकेचे मालक झालात का? मी इथे जेवायला बसलोय का? इथला मी मालक आहे, मला माहिती सांगत नाही, मला तुमच्याशी बोलायचेच नाही, असे म्हणत काय उपयायोजना करायच्या ते करा, सण सुरू आहेत, तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, असे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांना दिले. दरम्यान, महापालिकेने पाइपलाइनमधील हवा न काढताच पंप सुरू केल्याने दोन दिवसांपूर्वी पाइपलाइन फुटली असा आरोप बैठकीत करण्यात आला. 

सहा दिवसांनंतर आले पाणी  
माझ्या वॉर्डात तब्बल सहा दिवसांनंतर पाणी आल्याची तक्रार महापौर घडामोडे यांनी बैठकीत केली. ज्या भागात पाण्याचा गॅप पडला आहे, त्या भागाला पाणी देण्यास प्राधान्य आहे का, इतर भागांत? असा प्रश्‍न त्यांनी अधिकाऱ्यांना केला, त्याचे देखील अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

यंत्रणेसाठी फोनाफोनी 
महापालिकेच्या वीज पंपांना अखंडित वीज मिळावी म्हणून आवश्‍यक यंत्रणा उभारण्यासाठी अद्याप वीज कंपनीने कोटेशन दिलेले नाही, असा खुलासा श्री. चहेल यांनी केला. त्यावर नंदकुमार घोडेले यांनी वीज कंपनीचे कार्यालय एवढे दूर आहे का? तातडीने जाऊन कोटेशन घेऊन या, असे म्हणत स्वतःच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. त्यानंतर ही जबाबदारी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याकडे देण्यात आली. 

‘समांतर’कडून सुपारी! 
समांतर जलवाहिनीचे काम बंद केले, पुन्हा कंपनी आली पाहिजे, यासाठीच अधिकारी शहरावर पाणीसंकट आणत आहेत, असा आरोप माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी केला. विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे मला दीड लाख मेसेज नागरिकांना करावे लागल्याचे ते म्हणाले.

हे षड्‌यंत्र आहे का?
ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळित करून शहरातील वातावरण खराब करण्याचे हे षड्‌यंत्र तर नाही ना, अशी शंका उपमहापौर स्मिता घोगरे यांनी उपस्थित केली.

दूषित पाण्यामुळे आयुक्त आजारी
शहरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहेच, त्यासोबत दूषित पाण्यामुळे नागरिकांचे 
आरोग्य खराब होत आहे. आयुक्तदेखील आजारी असून, दूषित पाण्यामुळेच ते आजारी पडले असावेत, असा आरोप श्री. देसरडा यांनी केला.

Web Title: aurangabad news amc water