एटीएम युजर्सच्या पैशांवर भामट्याची विमानवारी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - एटीएम सेंटरवर नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारल्यानंतर हरियाणातील गावी जाण्यासाठी भामट्याने चक्क विमानवारी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषत: हरियानाहून औरंगाबादला येण्यासाठी त्याने गावकऱ्यांकडून हातउसने पैसे घेतले. पुन्हा जाताना तो ‘चोरकमाई’ करून विमानप्रवासाला निघाला खरा पण नंतर पोलिसांच्या तावडीत सापडला.

औरंगाबाद - एटीएम सेंटरवर नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारल्यानंतर हरियाणातील गावी जाण्यासाठी भामट्याने चक्क विमानवारी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषत: हरियानाहून औरंगाबादला येण्यासाठी त्याने गावकऱ्यांकडून हातउसने पैसे घेतले. पुन्हा जाताना तो ‘चोरकमाई’ करून विमानप्रवासाला निघाला खरा पण नंतर पोलिसांच्या तावडीत सापडला.

इम्रतखान सुखाखान (वय २४, रा. पलवल, हरियाना) असे संशयिताचे  नाव आहे. त्याचा साथीदार मोहम्मद सलीम हाजीरखान (वय ३३) याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबादेतील कचनेरनजीक खोडगाव येथे मोहंमद सलीम याची सासुरवाडी आहे. तो इम्रतखानला घेऊन सासरी येत होता. त्यानंतर शहरातील मुकुंदवाडी भागातील एटीएम सेंटरवर दोघे ठाण मांडीत होते. तेथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांवर ते लक्ष ठेवून असायचे. एटीएमच्या व्यवहाराची अधिक माहिती नसलेल्या ग्राहकांचे एटीएम मशिनमध्ये कार्ड स्वॅप करुन पासवर्ड फिड करताना तो लक्षात ठेवायचे. पैशांच्या बटनावर प्रेस करताच हे भामटे मध्येच युजर्सना अडवायचे. दुसरे बोट मशिनवरील एका बटनावर प्रेस करून ठेवीत एटीएम मशिनची पूर्ण प्रक्रिया होण्याआधीच एटीएममध्ये पैसे नाहीत, ट्रान्जॅक्‍शन रद्द झाले अशी कारणे सांगून युर्जसना एटीएम सेंटरबाहेर जाण्यास भाग पाडीत होते. त्यानंतर ते पैसे काढीत होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर व उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी सुमारे वर्षभर तपास करुन संशयिताची माहिती व मोबाईल लोकेशन मिळवले. त्यानुसार, दोघांना पाठोपाठ अटक केली. यातील इम्रतखान याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तेरा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अशी झाली दोघांची ओळख
इम्रतखानचे शिक्षण आठवीपर्यंत झाले. मोठा परिवार पण तीन एकरच शेती. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच. हरियानातील मेवातमध्ये इम्रतखानची आत्या राहते. तेथे तो जात असल्याने मोहंमद सलीम व त्याची ओळख झाली. यानंतर दोघांची गट्टी जमली व मोहंमद सलीमनेच त्याला औरंगाबादला बोलावले होते.

सलीमने केली दिवाळी साजरी
नागरिक, युजर्सच्या कष्टांच्या पैशांवर डल्ला सलीम व इम्रतखानने मारला. इम्रतने विमानप्रवास करुन गावातील घेतलेल्या उसन्या पैशांची परतफेड केली. तर सलीमने मिळवलेल्या साडेपाच लाख रुपयांत साडेचार लाखांचा जुना ट्रक, आईसाठी आभूषणे, तसेच सासरच्या मंडळींना कपडे घेऊन दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहे तंत्र...
एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून युजर असल्याचे ते भासवत होते. काहींना पैसे काढण्यास मदत करुन एटीएमचीही अदलाबदल ते करीत होते. एकीकडे युजर्सने बटन प्रेस करायला सुरवात केली की भामटा स्क्रीनवरील दुसऱ्या बाजूचे बटन दाबूनच ठेवत होता. त्यामुळे पैसेच निघत नव्हते. यामुळे वेटिंग करणारा युजर त्रस्त होऊन बाहेर आला की ते इप्सित साध्य करीत होते.

Web Title: aurangabad news atm