औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवाचे आज उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गुरुवारपासून (ता.१८) प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील विविध भाषेतील विविध धाटणीचे तीस सिनेमे दाखविण्यात येणार आहे. सात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांना एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गुरुवारपासून (ता.१८) प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील विविध भाषेतील विविध धाटणीचे तीस सिनेमे दाखविण्यात येणार आहे. सात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांना एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

प्रोझोन मॉलमधील आयनॉक्‍स थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता दिग्दर्शक तथा अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, स्मिता तांबे यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. यावेळी नाथ ग्रूपचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव  कदम, नाटककार प्रा. अजित दळवी, अशोक राणे, उद्योजक सुनील कीर्दक, डॉ. उल्हास गवळी, सुजाता कानगो, प्रिया धारूरकर, शिव कदम, मोहम्मद अर्शद, यशवंतराव प्रतिष्ठानचे नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, विजय कान्हेकर, बिजली देशमुख, डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहील. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर अतनू मुखर्जी दिग्दर्शित व अभिनेता मनोज वाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रूख’ हा सिनेमा दाखविण्यात येणार आहे. महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, मंगेश देसाई, अलोक राजवाडे, हंसल मेहता, गिरीश मोहिते आणि संध्या गोखले हे कलाकार रसिकांशी संवाद साधतील.

अमोल पालेकर यांना जीवनगौरव 
‘रूख’ चित्रपटाने महोत्सवाची सुरवात होईल. २० जानेवारीला ‘मराठी चित्रपट आणि जागतिक व्यासपीठ’ यावर चंद्रकांत कुलकर्णी यांचा परिसंवाद होणार आहे. पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्या उपस्थितीत २१ जानेवारीला सायंकाळी सात वाजता महोत्सवाचा समारोप होणार आहे. दरम्यान, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रोझोन मॉल, नार्मिक ग्रूप, विशाल ऑप्टिकल, साकेत बुकवर्ल्ड, जिजाऊ मेडिकल, महात्मा गांधी भवन, स्वाद हॉटेल, नैवेद्य हॉटेल या आठ ठिकाणी नोंदणी सुरू आहे.

Web Title: aurangabad news Aurangabad International Film Festival