जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेत एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

  • अध्यक्ष निवडत सर्वसाधारण सभेचे कामकाज
  • रेटण्याचा भाजप सदस्यांचा डाव आला अंगलट

  • अध्यक्ष निवडत सर्वसाधारण सभेचे कामकाज
  • रेटण्याचा भाजप सदस्यांचा डाव आला अंगलट

औरंगाबाद: तब्बल चार महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न भाजपच्या चांगलाच अंगलट आला. अध्यक्ष व सभागृहाच्या सचिवांनी सभेला येण्यास उशीर केला म्हणत भाजपने स्वःतच अध्यक्ष निवडत सर्वसाधारण सभेचे कामकाज रेटण्याचा डाव टाकला. नियमानूसार वंदे मातरम गीताने सभेची सुरुवात करायची म्हणून सगळे भाजपचे सदस्य उभे राहिले खरे, पण वंदे मातरम म्हणण्या ऐवजी राष्ट्रगीत सुरु केले. शिवसेनेचे सदस्यांनी सभेची सांगता राष्ट्रगीताने होत असते मग आता सभा संपली अस समजायच का? असे म्हणत भाजपला कोंडीत पकडले. शेवटी दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ भाजप सदस्यांवर आली. सत्ताधाऱ्यांवर कुरघोडींचा प्रयत्न फसल्यामुळे भाजप सदस्यांचे चेहरे पडले होते.

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 23 सदस्य निवडूण आलेले असतांनाही विरोधी पक्षात बसावे लागल्याचे शल्य भाजपच्या नगरसेवकांना अजूनही बोचते आहे. याची प्रचिती पहिल्याच सर्वसाधारण सभेत दिसून आले. दुपारी एक वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पावणे दोन वाजले तरी जि.प. अध्यक्ष व सचिव सभागृहात आलेले नव्हते. भाजपचे सर्व सदस्य वेळेवर येऊन बसल्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेला धारेवर धरण्याची रणनिती आखली. एल.जी. गायकवाड या भाजप सदस्यांनी अध्यक्ष जर सभेसाठी वेळेवर सभागृहात हजर नसतील, तर जिल्हा परिषद अधिनियमानूसार आणि कोरम पुर्ण असेल तर ऐनवेळी अध्यक्ष निवडूण कामकाज चालवता येते याची आठवण करून दिली. लगोलग शिवाजी पाथ्रीकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करून त्यांना सभागृहातील अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होण्याची विनंती केली. पाथ्रीकर हे देखील अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन बसले.

वंदे मातरम ऐवजी गायले राष्ट्रगीत
प्रथेनूसार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज वंदे मातरमने सुरु होते. त्यानूसार भाजप सदस्य गायकवाड यांनी सर्वांना वंदे मातरमसाठी उभे राहण्याची विनंती केली. हा प्रकार सुरु असतांनाच शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. देवयाणी डोणगांवकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे सभागृहात आले. पण त्याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या सदस्यांनी वंदे मातरम सुरु करेंगे सुरु कर म्हणत चक्क राष्ट्रगीताला सुरुवात केली. हा प्रकार शिवसेना सदस्यांचा लक्षात आला. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपवर राष्ट्रगीत व वंदेमातरमचा अवमान केल्याचे म्हणत पलटवार केला. राष्ट्रगीत म्हटल्यामुळे सभा संपली असे जाहीर करावे लागेल, कारण सभेची सांगताच राष्ट्रगीताने केली जाते याची आठवण करून देत भाजपला कोंडीत पकडले. आपले चुकल्याची जाणीव झाल्यावर भाजप सदस्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा सर्व सदस्यांनी वंदेमातरम म्हटले आणि त्यानंतरच सर्वसाधारण सभेच्या कामाला सुरुवात झाली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: aurangabad news aurangabad zilla parishad meeting