भाजपवर कुरघोडीचा डाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

औरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे चीनच्या दौऱ्यावर गेल्याची संधी साधून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्याचा डाव आखला आहे. शंभर कोटीच्या रस्त्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी करण्याची तयारी शिवसेनेच्या स्थायी समितीमधील चार सदस्यांनी केली आहे. दरम्यान, सभा घेण्यासाठी नगर सचिवांसोबतदेखील चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्यापासून शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. निधीचे श्रेय घेण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्यामुळे शिवसेनेला हा विषय त्रासदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. सात) झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपने खेळी खेळून शंभर कोटीचा निधी आम्हीच आणला, आम्हीच सत्कार स्वीकारणार असे म्हणत महापौर भगवान घडामोडे यांचा सत्कार केला. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला; मात्र त्याचा परिणाम महापौरांनी सर्वसाधारण सभेवर जाणवू दिला नाही. उलट सायंकाळी उशिरापर्यंत सभा घेत शिवसेनेच्या बहिष्काराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी सेनेने व्यूहरचना आखल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. 

प्राप्त माहितीनुसार, स्थायी समितीतील चार सदस्यांनी एखाद्या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांना सभा घ्यावी लागते. या नियमाचा आधार घेत स्थायी समितीतील शिवसेनेचे चार सदस्य विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करणार असल्याचे समजते. या विशेष सभेत शंभर कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा विषय ठेवण्यात येणार आहे. स्थायी समिती सदस्यांच्या मागणीनंतर आपत्कालीन परिस्थितीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर, किंवा सभापती हे सभेचे कामकाज पाहू शकतात. त्यामुळे महापौर चीन दौऱ्यावर गेल्याची संधी शिवसेना साधण्याची शक्‍यता आहे. 

नगरसचिव विभागात खल 
विशेष सर्वसाधारण सभेसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसचिव विभागातही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरसचिवांनी कायद्याचा अभ्यास करून व इतर महापालिकांसोबत चर्चा करून खुलासा करण्यात येईल, असे स्पष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: aurangabad news bjp