भाजपने निष्ठावंतांना पुन्हा डावलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - निष्ठावंत जुन्या नगरसेवकांना डावलून अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रवेश केलेल्या विजय औताडे यांना भाजपने उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या या निर्णयामुळे पक्षातील खदखद वाढली असून, वर्षांनुवर्षे पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊनही पदे मात्र बाहेरून आलेल्यांना मिळत असतील तर आमची एकनिष्ठता काय कामाची असा सवाल करीत अनेक जण उपमहापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी महापालिकेत फिरकले नाहीत. यापूर्वीदेखील भाजपने गटनेते, स्थायी समिती सभापतिपद नवख्यांनाच दिले आहे. 

औरंगाबाद - निष्ठावंत जुन्या नगरसेवकांना डावलून अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रवेश केलेल्या विजय औताडे यांना भाजपने उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या या निर्णयामुळे पक्षातील खदखद वाढली असून, वर्षांनुवर्षे पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊनही पदे मात्र बाहेरून आलेल्यांना मिळत असतील तर आमची एकनिष्ठता काय कामाची असा सवाल करीत अनेक जण उपमहापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी महापालिकेत फिरकले नाहीत. यापूर्वीदेखील भाजपने गटनेते, स्थायी समिती सभापतिपद नवख्यांनाच दिले आहे. 

महापालिकेतील उपमहापौरपद आगामी अडीच वर्षांसाठी भाजपकडे आहे. या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. तब्बल दहा जणांनी दावा केल्याने भाजपच्या कोअर कमिटीने नाव अंतिम करण्याचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात टोलवला होता. रात्री उशिरापर्यंत विजय औताडे, नितीन चित्ते, राजू शिंदे यांच्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विजय औताडे यांचे नाव अंतिम केले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज भरण्यात आला; मात्र या वेळी अनेकांनी दांडी मारली. निष्ठावंत जुन्या नगरसेवकांना डावलून अडीच वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या नवख्यांना पदे मिळत असतील; तर आमच्या निष्ठेचा काय फायदा? असा सवाल हे नगरसेवक खासगीत करीत आहेत. भाजपने यापूर्वीदेखील महापालिकेत नवख्यांनाच पदे दिलेली आहेत. सध्या गटनेतेपद प्रमोद राठोड यांच्याकडे असून, त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले गजानन बारवाल स्थायी समिती सभापती आहेत. त्यात आता श्री. औताडे यांची भर पडली आहे. श्री. औताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्षांच्या या निर्णयाच्या विरोधात कोणी उघडपणे बोलत नसले तरी अंतर्गत खदखद वाढली आहे. उमेदवारीसाठी दावा केलेल्यांमध्ये राजू शिंदे हे तिसऱ्यांदा, नितीन चित्ते दुसऱ्यांदा, कमल नरोडे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांना डावलून श्री. औताडे यांची वर्णी लावण्यात आली. त्यासाठी श्री. दानवे यांच्याशी असलेले नातेदेखील कामाला आल्याचे बोलले जात आहे. 

सर्वांनाच दिले आश्‍वासन
उपहापौरपदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी दहा नगरसेवक प्रयत्नशील होते. त्यातील अनेकांना तुमचे काम होईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळे सकाळी दहा वाजताच अनेकांनी महापालिकेत हजेरी लावली मात्र श्री. औताडे यांचे नाव अंतिम झाल्याचे कळताच त्यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. 

यापूर्वीही झाली होती वादावादी
बाहेरून पक्षात आलेल्यांना पदे देण्यावरून यापूर्वीही जुने विरुद्ध नवे असा वाद रंगला होता. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले किशनचंद तनवाणी यांना शहराध्यक्षपद देण्यास विरोध झाला. त्यानंतर उपमहापौरपद प्रमोद राठोड यांना दिल्यामुळे नितीन चित्ते यांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेत मोठा वादही झाला होता.

बागडेंची जवळीक शिंदेंना भोवली 
शिवसेनेने अनुभवी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिल्याने भाजपनेदेखील अनुभवी नगरसेवकाला उपमहापौरपद द्यावे, असे अनेक पदाधिकाऱ्यांचे मत होते. त्यानुसार राजू शिंदे यांचे नाव आघाडीवर होते; मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: aurangabad news bjp