औरंगाबाद: घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा! 

मनोज साखरे 
बुधवार, 21 मार्च 2018

घाटी रुग्णालयात रक्ताच्या सुमारे सत्तर बॅगच उपलब्ध आहेत. दोन दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. रक्ताची मोठी गरज असून दात्यांनी घाटी रुग्णालयात येऊन रक्तदान करावे. असे आवाहन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे यांनी केले आहे. 

औरंगाबाद : जनसामान्यांचा मोठा आधार असलेल्या घाटी रुग्णालयात रक्ताचा गत चार दिवसांपासून तुटवडा आहे. दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे रक्तपेढीचे अधिकारी, कर्मचारी व पॅरामेडीकलचे विद्यार्थी पुढे आले असुन सकाळपासून तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी रक्तदान केले आहे. 

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अकराशे खाटांची व्यवस्था आहे. तेथे दररोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होतात. मराठवाडा, खान्देश, पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणांहुन रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अपघात, आपत्कालीन स्थितीत आलेल्या रुग्णांना तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांना दरदिवशी सत्तर ते ऐंशी रक्ताच्या बॅग लागतात. घाटीत गत चार दिवसांपासून रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तपेढी विभागाकडुन वॉटसऍपद्वारे जनजागृती सुरु करण्यात आली आहे. तुटवड्याचे गांभीर्य लक्षात घेवून रक्तपेढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले असुन त्यांनी पॅरामेडीकलच्या विद्यार्थ्यांनाही रक्तदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही लगेचच साद घातली असुन दुपारपर्यंत पस्तीस विद्यार्थ्यांनी रक्‍तदान केल्याची माहिती घाटी रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे यांनी दिली. 

घाटी रुग्णालयात रक्ताच्या सुमारे सत्तर बॅगच उपलब्ध आहेत. दोन दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. रक्ताची मोठी गरज असून दात्यांनी घाटी रुग्णालयात येऊन रक्तदान करावे. असे आवाहन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे यांनी केले आहे. 

Web Title: Aurangabad news blood shortage in ghati hospital