'मुद्दा कळीचा, बोंड अळीचा' म्हणत शेतकऱ्यांनी रॉकेल घेतले अंगावर

सुषेन जाधव
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

आमच्यापैकी काही जणांना विभागीय कृषी सहसंचालकांना निवेदन देणार होतो, परंतू पोलिसांनी कृषी विभागात जाऊच दिले नाही. राजकीय दबाबखाली पोलिसांनी आमचे आंदोलन चिरडले
- संतोष जाधव, आत्मदहन करणारे शेतकरी

औरंगाबाद: "मुद्दा कळीचा, बोंड अळीचा' म्हणत बोंड अळीमुळे कपाशीचीची झालेली नुकसानभरपाई पोटी मदत मिळावी यासाठी जिल्हातील गंगापूर तालूक्‍यातील शेतकऱ्यांनी आज (बुधवार) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर रॉकेल अंगावर ओतून घेत सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

गळ्यात बोंडअळीने पोखरलेल्या बोंडाचा हार घालून, राज्य सरकारविरोधात घोषणा देत, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांचा समूह कृषी कार्यालयावर धडकला. राज्यभर बोंडअळीने थैमान घातल्याने कपाशीचे अतोनात नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या हाती छदामही उरला नाही. 22 डिसेंबर 2017 रोजी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून बागायतीसाठी 37 हजार 500 रुपये तर 30 हजार 800 रुपये मदत जाहीर केली, याला दोन महिने उलटले तरी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे संतोष जाधव यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रल्हाद खेडकर, गोरख चव्हाण, ज्ञानेश्‍वर तिवाडे, कडू तिवाडे यांच्यासह 35 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जामीन घेणार नाही - शेतकऱ्यांचा इशारा
आत्मदहन करणाऱ्या साधारण 35 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आमच्यापैकी कोणीही शेतकरी जामीन घेणार नाही असे संतोष जाधव यांनी सांगितले. सर्व शेतकऱ्यांवर कलम 143, 149,353, 309 आणि मुंबई पोलिस कायदा 135 तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news bond ali farmer kerosene police