बायपास सर्जरीत चार पटींनी वाढ

बायपास सर्जरीत चार पटींनी वाढ

औरंगाबाद - जागतिक सुखाची क्रमवारी ‘हॅपिनेस इंडेक्‍स’ सातत्याने घसरत आहे. त्यातच शर्करायुक्त आहार, व्यायामाचा अभाव यामुळे गेल्या आठ वर्षांत बायपास शस्त्रक्रिया चार पटींनी वाढल्याचे उरोशल्यचिकित्सक डॉ. योगेश बेलापूरकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. पूर्वी वर्षाकाठी पाचेकशे हृदय शस्त्रक्रियांची संख्या आता शहरात किमान दोन हजारांवर गेल्याचे ते म्हणाले.

हृदयविकाराचे वाढते प्रमाण आणि बायपास सर्जरीबाबत बोलताना डॉ. बेलापूरकर म्हणाले, ‘‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्‍समध्ये २००४-०६ मध्ये आपल्या देशाचा क्रमांक ११९ होता. गेल्यावर्षी तो घसरून १२२ वर गेला. ही आकडेवारीच बोलकी आहे. व्यसन नसले, तरी तरुणांच्या जीवनशैलीत कमालीचा तणाव येत आहे. व्यायामाची हौस राहिलेली नाही. बहुतांश खाद्यपदार्थांतून शर्करेचे सेवन अतिरिक्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे एकीकडे आनुवंशिक मधुमेहावर नियंत्रणासाठी मोठे प्रयत्न केले जात असतानाच, दुसरीकडे डायबेटिस व हृदयविकार वाढला आहे. तरुणांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांची झीज होण्याचे प्रमाण वाढल्याचे गेल्या सात ते आठ वर्षांत आढळून आले आहे. आहारात मासे आणि रोज एक ग्लास रेड वाईन घेतल्याने हृदयविकारावर नियंत्रण मिळविता येते, असेही अभ्यासात समोर आले आहे.’’ साठीनंतर करावी लागणारी बायपास सर्जरी आता चाळिशीतच करावी लागते. ही सामाजिक आरोग्यासाठी धोक्‍याची घंटा असल्याचे ते म्हणाले.

सेकंड ओपिनियन घ्या
‘डॉ. गुगल’ला फॉलो करू नका. अर्धवट ज्ञान नेहमी घातक असते. अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टीनेही रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज निघणार नसतील, तर बायपास सर्जरी करावी लागते. आपल्याला कोणत्या इलाजाने बरे वाटते, हे रुग्णाला कळते. जेव्हा उपचाराने फरक पडत नाही, शंका येतात, तेव्हा दुसऱ्या हृदयरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. या उपचारात विविध ब्रॅंडस्‌ची औषधे उपलब्ध असतात. त्यांच्या किमतीत मोठी तफावतही आढळते. त्या वेळी आपली ऐपत ओळखून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधी बदलता येते. 

जीवनदायी योजनेत दुरुस्तीची गरज
सध्या बायपास सर्जरीसाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेचा (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी योजना) बहुतांश गोरगरीब जनतेला लाभ होत आहे; परंतु हृदयाच्या काही किचकट शस्त्रक्रियांचे नाव बदलल्याने अनेक रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. इतर शासकीय मदतीच्या योजना आहेत; परंतु त्या वेळखाऊ आहेत. त्यामुळे या योजनेत ‘हृदयासंदर्भात सर्व शस्त्रक्रिया’ अशी दुरुस्ती गरजेची आहे.

समतोल आहार आणि व्यायामाचा अभाव तरुणांत आढळतो. सतरा वर्षांच्या तरुणाची बायपास करावी लागते, ही बाब गंभीरतेने पाहिली पाहिजे. शालेय जीवनापासूनच शारीरिक शिक्षण आणि खेळाला इतर विषयांइतकेच महत्त्व देण्याची नितांत गरज आहे. तरच येत्या वीस वर्षांत बायपास सर्जरीचे प्रमाण प्रयत्नपूर्वक कमी करता येईल. 
- डॉ. योगेश बेलापूरकर, कार्डियाक सर्जन, एमजीएम रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com