एटीएम कार्डद्वारे लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीला बेड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढत असाल तर सावधान..! तुमच्या पुढेमागे एटीएम केंद्रात भामटे असू शकतात. एटीएम कार्डची अदलाबदल करून व तुमचा पिन मिळवून ते परस्पर पैसे काढू शकतात. अशाच पद्धतीने शेकडो लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हरियाणा, उत्तर प्रदेशच्या एका टोळीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडे विविध बॅंकांची तब्बल ७० एटीएम कार्डस्‌ सापडली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.

औरंगाबाद - तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढत असाल तर सावधान..! तुमच्या पुढेमागे एटीएम केंद्रात भामटे असू शकतात. एटीएम कार्डची अदलाबदल करून व तुमचा पिन मिळवून ते परस्पर पैसे काढू शकतात. अशाच पद्धतीने शेकडो लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हरियाणा, उत्तर प्रदेशच्या एका टोळीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडे विविध बॅंकांची तब्बल ७० एटीएम कार्डस्‌ सापडली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.

शैलेंद्र सिंह घिसाराम (वय ४२, रा. दिल्ली), राजेश सतवीरसिंह (२५, रा. दिल्ली), बाळाराम गजेसिंह (३२, रा. हिस्सार, हरियाना), विनोदसिंह गजेसिंह (२५, रा. हिस्सार) अशी भामट्यांची नावे आहेत. त्यांचे उत्तर प्रदेशातील दोन साथीदार पसार आहेत. शहरातील रंगनाथ मस्के  हे ९ सप्टेंबरला वैजापूर येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी एटीएममध्ये कार्ड स्वॅप करूनही पैसे निघत  नव्हते. त्यामुळे मागेच उभ्या असलेल्या एका भामट्याने मदतीचा बनाव केला व त्यांचे कार्ड स्वॅप करून दिले. त्यानंतर मस्के यांना पिन क्रमांक टाकण्यास सांगितले. दरम्यान, भामट्याने मस्के यांचे एसबीआयचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवत हुबेहूब दुसरे कार्ड त्यांच्या हाती टेकवले. या वेळेत मस्के यांनी एंटर केलेला एटीएमचा पिन भामट्याने हेरून घेतला. यानंतर तो पसार झाला. 

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मस्के यांना खात्यातून ७७ हजार रुपये कपात झाल्याचा संदेश आला. त्या वेळी एटीएम कार्ड तपासले असता, ते आपले नसल्याचे मस्के यांच्या लक्षात आले व भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे लांबविल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात त्यांनी तक्रार दिल्यानंतर ग्रामीण सायबर सेलने शोध घेऊन भामट्यांना मध्य प्रदेशातून अटक केली.

‘तो’ आहे सातवी पास
मुख्य संशयित शैलेंद्रसिह सातवी पास असून त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याला देशभरातील स्थळांची माहिती आहे. त्याने हरियाना व यूपीतील तरुणांना गोळा करून एक टोळी तयार केली. या टोळीकडे स्वत:ची कार असून त्याद्वारेच ते विविध राज्यांत फिरून पैसे हडपतात. या पैशांतून मौजमजा करून उरलेला पैसा उच्च राहणीमानासाठी खर्च केला.

असा लागला छडा...
घटनेच्या दिवशी एटीएम सेंटरवर डम डाटाद्वारे सायबर सेलने मोबाइल क्रमांकाचा अभ्यास केला व तांत्रिक आधार घेऊन भामट्यांचे लोकशेन मिळविले. यानंतर त्यांना मध्य प्रदेशातून अटक केली. ही कारवाई निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सय्यद मोसीन, रतन वारे, किरण गोरे, रवींद्र लोखंडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांनी केली.

टोळीचा पिन क्रमांक एक हजार
भामट्यांकडे विविध बॅंकांची एकूण ६५ एटीएम कार्ड असून बहुतांश यातील बनावट आहेत. नागरिकांचे एटीएम लंपास केले, की ते पैसे काढीत. त्यानंतर पिन बदलून तो अंकात एक हजार असा ठेवत होते. तो पिन क्रमांक फक्त टोळीतील लोकांनाच माहीत असायचा.

Web Title: aurangabad news Chains to inter-state gang looting through ATM cards