पुण्याच्या महिलेची अंधश्रद्धेतून सात लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या पुण्यात एका महिलेची चक्क अंधश्रद्धेतून तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक झाली. पैशांचा पाऊस पाडून रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली गंडवणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन भोंदूबाबांना औरंगाबाद पोलिसांनी बुधवारी (ता. २५) अटक केली.

औरंगाबाद - पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या पुण्यात एका महिलेची चक्क अंधश्रद्धेतून तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक झाली. पैशांचा पाऊस पाडून रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली गंडवणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन भोंदूबाबांना औरंगाबाद पोलिसांनी बुधवारी (ता. २५) अटक केली.

शेख अकील शेख रफिक (४८, रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा) व शेख अजहर शेख अफसर (२३, रा. दरेगाव, ता. सिंदखेडराजा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता गजानन लोखंडे (३५, मूळ. रा. बुलडाणा) या मनीषा आदेश गुजकर (३६, रा. मोर्शी, पुणे) यांच्याकडे घरकाम करतात. त्या बुलडाण्यावरून पुण्याला जाताना ट्रॅव्हल्सचालकाशी त्यांची ओळख झाली. त्यावेळी चालकाने तिला पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देण्याऱ्या व्यक्तीबाबत माहिती दिली. यावर विश्‍वास ठेवून तिने पुण्यात आल्यानंतर मनीषा गुजकर यांना सारा प्रकार कथन केला. यावर विश्‍वास बसल्याने गुजकर यांनी १६ एप्रिल २०१७ ला ट्रॅव्हल्सचालकाशी संपर्क साधला. त्याने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयोग पाहण्यासाठी अकोला जिल्ह्यात गुजकर यांना बोलाविले. त्यानंतर गुजकर व संगीता लोखंडे या दोघी १८ एप्रिलला बुलडाणा येथे पोचल्या. तेथे त्यांना एकजण भेटला. त्याने दर्शनासाठी त्यांना शेगाव येथे नेले. त्यानंतर ते पातूर (जि. अकोला) येथे एका मळ्यात आले. मळ्यात एका झोपडीत आधीच दोन महिला, चार पुरुष व एक मांत्रिक बसले होते. दोघी आल्यानंतर मांत्रिकाने हळद, लिंबू, पाणी यांचा मंत्रोच्चार करून त्यांना हातचलाखी करून चमत्कार दाखवला. त्यातील पाचशे रुपयांच्या दोन नोटा गुजकर यांना दिल्या व पूजापाठ करून त्यांना जाण्याचे सांगितले. फाजील विश्‍वास बसल्यानंतर गुजकर पुण्यात परतल्या. त्यानंतर २० एप्रिलला भोंदूंनी सांगितल्यानुसार त्या औरंगाबादेत सात लाख रुपये घेऊन आल्या. येथील कटकटगेट भागात येत त्यांनी शेख अकील याच्याशी संपर्क साधला. त्या भेटल्यानंतर त्याने भस्म व पूजापाठाच्या साहित्यासाठी गुजकर यांच्याकडील साडेसहा लाख आणि संगीता यांच्याकडून ५० हजार रुपये घेत शेख अजहर याच्याकडे दिले. पैसे मिळतील असे सांगून दोघे पसार झाले. यानंतर दोघी पुण्यात परतल्या. त्यांनी अनेकदा भोंदूबाबांशी संपर्क साधला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे गुजकर यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर जिन्सी ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली. दुप्पट रकमेचे आमिष दाखविणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या साथीदाराला जिन्सी पोलिसांनी शोध घेऊन बुधवारी अटक केली. ही कारवाई जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, हवालदार संजय गावंडे, पंढरीनाथ जायभाये व संजय झरे यांनी केली.

औरंगाबाद-साखरखेर्डा साखळी
औरंगाबादेतील नारेगावातही पैशांचा पाऊस पाडून दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली अशीच मोडस वापरण्यात येत होती. या टोळीचा पर्दाफाश झाला, तेव्हा यात साखरखेर्डा येथील भोंदूबाबाही असल्याचे उघड झाले होते. औरंगाबादेतील दुकान बंद झाल्यानंतर या भोंदूबाबांनी विदर्भातून आपले उखळ पांढरे करण्यास सुरवात केली होती.

Web Title: aurangabad news cheating superstition women