प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार शहर बस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

शहर बससेवा प्रायोगिक तत्त्वावर खासगी कंत्राटदारामार्फत चालविण्याचा विचार असून, यासंदर्भात अद्याप आयुक्तांसोबत चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
- नंदकुमार घोडेले, महापौर.

औरंगाबाद - खासगी कंत्राटदारामार्फत प्रायोगिक तत्त्वावर शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, शनिवारी (ता. 20) एसटी महामंडळाला शिवनेरी बस पुरविणाऱ्या कंत्राटदारासोबत चर्चा करण्यात आली; मात्र यासाठी आता आयुक्तांच्या होकाराची प्रतीक्षा आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला किमान पाच बस खरेदी करून शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापौरांची गेल्या काही दिवसांपासून धडपड सुरू होती; मात्र 18 जानेवारीला आयोजित स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने या बस खरेदी करता आल्या नाहीत. त्यामुळे 23 जानेवारीचा मुहूर्त हुकला आहे. असे असले तरी आगामी दहा दिवसांत तरी शहर बससेवा सुरू झाली पाहिजे यासाठी महापौरांचे प्रयत्न सुरूच आहेत. बस खरेदी, परिवहन समितीची स्थापना, बससेवा चालविण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती यासाठी मोठा वेळ लागणार असल्याने त्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर खासगी कंत्राटदारामार्फत पाच बस सुरू करण्यासाठी शनिवारी चर्चा करण्यात आली.

या वेळी श्री. घोडेले म्हणाले, ""एसटी महामंडळात नुकतीच शिवनेरी बस दाखल झाली आहे. शिवनेरी बस पुरविणाऱ्या श्री. निजामपूरकर यांच्याकडूनच पाच बस शहरातील पाच प्रमुख मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाचा परवाना, एसटी महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. 40 सीटच्या या बस असून, प्रतिकिलोमीटर 40 रुपयांचा दर मिळावा, रोज एक बस तीनशे किलोमीटर चालली पाहिजे, अशी कंत्राटदाराची मागणी आहे,'' असे महापौरांनी सांगितले. 

या मार्गांवर धावतील बस 
हर्सूल-रेल्वेस्टेशन ते नक्षत्रवाडी, चिकलठाणा ते नगर नाका, हर्सूल ते चिकलठाणा, नगर नाका ते वाळूज, सातारा-देवळाई ते मध्यवर्ती बसस्थानक या प्रमुख पाच मार्गांवर पाच बस धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे. तिकीट दर एसटी महामंडळाचाच राहणार आहे, असे महापौरांनी नमूद केले. 

Web Title: aurangabad news city bus