‘समांतर’ची कंपनी येणार!

‘समांतर’ची कंपनी येणार!

औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी पुन्हा येण्याची शक्‍यता आहे. कंपनीला आधी कडाडून विरोध करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी बुधवारी (ता. दहा) समांतर योजना मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून काही वर्षांपासून वाद सुरू आहे. महापालिकेने पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण करून हे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला दिले होते. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर योजना राबविण्यात येत होती. कंत्राटदाराने जायकवाडी ते नक्षत्रवाडी मुख्य पाइपलाइन; तसेच शहरात अंतर्गत पाइपलाइन टाकणे, पाण्याच्या टाक्‍या बांधणे यासह इतर कामांचा समावेश यात होता; मात्र १४ महिन्यांतच महापालिकेने कंपनीच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करीत करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपने समांतरच्या विरोधात जोरदार मोहीम राबविली होती. 

आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत करार रद्द करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली, तर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शहराच्या मानगुटीवर बसलेले समांतरचे भूत भाजपच उतरवेल अशी घोषणा केली होती. भाजप व नागरिकांच्या विरोधी भूमिकेमुळे ३० जून २०१६ रोजी सर्वसाधारण सभेत समांतरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या समांतरचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आता भाजपचे पदाधिकारी योजनेसाठी पुढाकार घेत आहेत.

खासदारांच्या भेटीत खलबते 
भाजपचे खासदार तथा कंपनीशी संबंधित असलेले सुभाषचंद्र गोयल हे नुकतेच औरंगाबादेत येऊन गेले. त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका बदलली आहे. श्री. औताडे, श्री. बारवाल यांनी शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी समांतर योजनेचे काम होणे आवश्‍यक आहे. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात माघार घ्यावी किंवा कंपनीसोबत चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी केली.

२५७ कोटी पडून
योजनेच्या कामासाठी केंद्राकडून १४३.८७ कोटी रुपये, तर राज्य शासनाकडून १७.९४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कम आयडीबीआय बॅंकेत ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत त्यावर ११३ कोटी ४५ लाख रुपये व्याज मिळाले आहे. महापालिकेने बॅंक गॅरंटीपोटी ९४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

समांतर जलवाहिनी योजना मी आणली असून ती पूर्ण करावीच लागेल; मात्र भाजपवाल्यांनी त्यास विरोध केला. सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा ही फेल झालेली आहे. त्यामुळे लोक माझ्याही दारात आम्हाला पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. स्वत: माझ्या घरीदेखील सहाव्या दिवशी पाणी येते. वेळीच कामाला सुरवात झाली असती तर ९० टक्के काम पूर्ण झाले असते. गरज लक्षात घेऊन प्रशासनाने व संबधित कंपनीने तडजोड करून ही योजना सुरू करावी. आता त्यास भाजपचाही पाठिंबा आहे.
- चंद्रकांत खैरे, खासदार 

कंपनीच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी विधी सल्लागारांकडून कायदेशीर सल्ला मागविला आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर कंपनीला बाजू मांडू द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.
- नंदकुमार घोडेले, महापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com