नगरसेविकेच्या घरी चोरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - शहरात चोरांचे थैमान सुरू असून, वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांची घरे सुरक्षित नसतानाच आता नगरसेविकेच्या घरात डल्ला मारून चोरांनी रोख चार लाख ६८ हजार रुपयांसह सात लाख आठ हजारांचा ऐवज चोरी केला. ही घटना सोमवारी (ता.३१) रात्री उघड झाली. 

औरंगाबाद - शहरात चोरांचे थैमान सुरू असून, वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांची घरे सुरक्षित नसतानाच आता नगरसेविकेच्या घरात डल्ला मारून चोरांनी रोख चार लाख ६८ हजार रुपयांसह सात लाख आठ हजारांचा ऐवज चोरी केला. ही घटना सोमवारी (ता.३१) रात्री उघड झाली. 

समतानगर भागात नगरसेविका रेश्‍मा अशफाक कुरेशी यांचे दोन मजली घर आहे. त्यांचे पती अशफाक कुरेशी तसेच त्यांच्या सहा भावांचे कुटुंब एकत्रित इमारतीत राहतात. रेश्‍मा कुरेशी यांच्या छोट्या नणंदेकडे लग्न समारंभ असल्याने सर्वजण सोमवारी (ता.३०) सायंकाळी बीड बायपासवरील फातेमा लॉन येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. सोहळा आटोपल्यानंतर मसीलोद्दीन कुरेशी रात्री दहा वाजता घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाहणी केली असता चोरांनी घरातील कपाटाला लक्ष्य करून रोख चार लाख ६८ हजार रुपये व दागिन्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय घरी पोहोचले. दरम्यान, क्रांतीचौक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी व त्यांचे पथक पोचले. तसेच श्‍वान पथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाचे ठसे घेतले, श्‍वान मात्र घराभोवती घुटमळले. या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

रोख रक्कम वाचली... 
चोरट्यानी चोरीनंतर लगतच असलेले अशपाक कुरेशी यांचे भाऊ एजाज यांचे घर बनावट चावीने उघडून कपाटाचे ड्रॉवर त्यांनी उघडले; पण आत त्यांना काही मिळाले नाही. दुसऱ्या ड्रॉवरमध्ये रक्कम होती व त्या ड्रॉवरला लक्ष्य न केल्याने रक्कम चोरांच्या हाती लागण्यापासून   वाचली.

म्हणून घरीच होते दागिने
मसिलोद्दीन कुरेशी यांच्या तीन वर्षीय मुलीचा पंधरा दिवसांपूर्वीच आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे बहिणीच्या लग्नात मसीलोद्दीन व त्यांची पत्नी यांनी दागिने परिधान न करण्याचा निर्णय घेत घरीच ठेवले होते. त्यामुळे दोन लाख चाळीस हजारांचे दागिने चोरांच्या हाती लागले.

Web Title: aurangabad news Corporator's house theft

टॅग्स