तरुणीची छेड काढणाऱ्यास बेदम चोपले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - महाविद्यालयीन तरुणीला अश्‍लील बोलून तिची भररस्त्यात छेड काढल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ३०) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास जालना रस्त्यावरील आकाशवाणीलगत घडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी अर्धा तास चोप देऊन तरुणाला पोलिसांच्या हवाली केले.  

औरंगाबाद - महाविद्यालयीन तरुणीला अश्‍लील बोलून तिची भररस्त्यात छेड काढल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ३०) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास जालना रस्त्यावरील आकाशवाणीलगत घडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी अर्धा तास चोप देऊन तरुणाला पोलिसांच्या हवाली केले.  

जालना रस्त्यावरून दुपारी तीनच्या सुमारास चोवीस ते पंचवीस वर्षे वयाची तरुणी जात होती. त्यावेळी तिशीलतल्या एका तरुणाने तिचा रिक्षातून पाठलाग केला. आकाशवाणीलगत तरुणाने तिला गाठले व तो रिक्षातून उतरला. त्यानंतर त्याने तरुणीला अर्वाच्य व अश्‍लील भाषा वापरली. त्यामुळे तिने तरुणाला समज दिली, पण तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे तिने रिक्षात बसवून त्याला पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून नागरिक जमा झाले. काही तरुण पुढे आले व त्यांनी तरुणाला रिक्षातून बाहेर खेचले आणि बेदम मारहाण सुरू केली. अर्धातास मारहाण सुरूच होती. यात तरुण गंभीर जखमी झाला. चेहऱ्यासह तोंडावर व अंगावर त्याला जखमा झाल्या. मारहाणीचा प्रकार पाहून वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चार्ली पोलिसही पोचले, चौकशी केल्यानंतर राजू गायकवाड (रा. कैलासनगर) असे तरुणाचे नाव व तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तरुणाची जमावातून सुटका केली व त्याला ताब्यात घेऊन जिन्सी पोलिस ठाण्यात नेले. या घटनेप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

बचावासाठी पुढे आली तरुणी 
तरुणाला बेदम मारहाण सुरू झाल्याने हा प्रकार पाहून तरुणीही चक्रावली, मारहाणीत त्याचे बरेवाईट होऊ शकते, ही बाब ओळखून तरुणीनेच पुढाकार घेऊन त्याला मारण्यापेक्षा पोलिसांच्या हवाली करावे, अशी विनंती तिने जमावाला केली. परंतु पोलिस आल्यानंतरच त्याची सुटका झाली.

वाहतूक कोंडी
या प्रकाराने शहर वाहतूक कार्यालय ते आकाशवाणीलगत चौकापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. येथे पंधरा मिनिटे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी नंतर कोंडी सोडवून रस्ता मोकळा केला.

छेडछाडीला लगाम केव्हा?
घरात घुसून छेडणे, अश्‍लील टोमणे मारून पाठलाग करणे, महाविद्यालय, बसस्टॉप व भररस्त्यात टवाळखोरांकडून त्रास वाढत आहे. चार महिन्यांपूर्वीच औरंगाबाद लेणीवर एका तरुणीची छेड काढल्याचे गंभीर प्रकरण घडले असून, समर्थनगरातही मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना त्रास सुरू होता. यावर पोलिस विभागाने उपाय योजून लगाम लावण्याची गरज आहे.

Web Title: aurangabad news crime