‘आत्मा’ यंत्रणेत तब्बल ६६ लाखांचा गैरव्यवहार

‘आत्मा’ यंत्रणेत तब्बल ६६ लाखांचा गैरव्यवहार

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या उथ्थानासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘आत्मा’ प्रकल्पालाच घरघर लागल्याचा प्रकार औरंगाबादेत उघड झाला. लेखापालाने सुमारे ६६ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले असून यात तत्कालीन बॅंक अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकल्पार्तंगत लेखपालाने शासनाला अंधारात ठेवून रकमा व धनादेश स्वत:च वटवून रक्कम गिळंकृत केली. 

सुनील गहेनाजी जाधव (वय ६०, रा. जाधववाडी, सुरेवाडी) असे संशयित लिपिकाचे नाव आहे. त्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक विलास रामराव रेणापूरकर यांनी तक्रार दिली. २७ जून २०१२ ते तीस जून २०१७ पर्यंत आत्मा प्रकल्पात सुनील जाधव कार्यरत होता. त्याची बदली झाल्यानंतर के. जी. पाटील हे लेखाकर्मचे काम पाहत होते. पाटील यांनी  प्रकल्पाच्या दोन बॅंक खात्याचे स्टेटमेंट मिळविली. त्यात सुनील जाधव याने रकमेचा घोळ केल्याचे समोर आले. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर जाधवने प्रकल्प कार्यालयाची परवानगी न घेता बॅंकेत रक्कम जमा केली, तसेच याचा खुलासाही कार्यालयाकडे केला नाही. यानंतर कार्यालयाची नोंदवही व पासबुकाची तपासणी केली. यात धनादेशची नोंदही कॅशबुकमध्ये केलेली नव्हती. कॅशबुकमध्ये नोंद टाळलेले धनादेश जाधवने तत्कालीन प्रकल्प उपसंचालक एस. व्ही. शिरडकर यांच्या नावाने बनावट व खोटी सही केली व तत्कालीन बॅंक अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने ४६ लाख चार हजारांची रक्कम स्वत:च्या नावे उचलली. 

या प्रकरणानंतर कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक संजीव पडवळ यांनी सध्या जाधव कार्यरत असलेल्या ठिकाणी हाताळत असलेल्या बॅंक खात्याची पाहणी केली. त्या वेळी जाधव याने १९ जुलै २०१७ ला दहा लाख रुपये स्वत:च्या नावे लिहून आहारण व संवितरण अधिकारी म्हणून संजीव पडवळ यांची बनावट सही केली व स्वत:च्या खात्यात जमा करून नंतर प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्या बॅंक खात्यात रकमेचे नियमबाह्य हस्तांतरण केल्याचे दिसून आले. याचपद्धतीने जाधवने अनेक धनादेश स्वत:च्या नावे एकूण २० लाख १५ हजार रुपयांचा धनादेश वटवून अपहार केला. एकूण ६६ लाखांच्या अपहार प्रकरणात त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची मंगळवारी (ता. आठ) नोंद करून त्याला अटक केली. 

* एकूण ६६ लाखांच्या शासकीय रकमेचा गैरव्यवहार
* सेल्फचेकद्वारे सुनील जाधवने रकमा उचलल्या
* तत्कालीन प्रकल्प उपसंचालकांच्या खोट्या सह्या करून धनादेश वटविले
* बॅंक ऑफ महाराष्ट्रातील तत्कालीन अधिकाऱ्यांचाही सहभागाचा संशय
* कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार समितीमार्फत चौकशी, निश्‍चित आकडा अद्याप स्पष्ट नाही.

आत्माला घरघर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) हा प्रकल्प राबवीत आहे. शेतकी व आर्थिकदृष्टीने शेतकऱ्यांना उभारीचे काम प्रकल्पाद्वारे सुरू होते; परंतु आत्मा प्रकल्पातच आता मोठा भ्रष्टाचार समोर येत आहे. गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेला घरघर लागली आहे. या गैरव्यवहाराची मोठी व्याप्ती असल्याचे समोर येत आहे.

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
वरिष्ठ लिपिक सुनील जाधव यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी सोमवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी तपास करून मंगळवारी रात्री जाधवला अटक केली. जाधव यास या प्रकरणात सहकार्य करणारे अन्य कोणी साथीदार आहेत का, याच्या चौकशीसाठी, तसेच हस्ताक्षर नमुने तपासणीसाठी जप्त करावयाचे असल्याने त्यास पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ॲड. बी. एम. राठोड यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com