बनावट कागदपत्रांआधारे सैन्यात भरती झालेले ३७ जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - बनावट रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या ३७ उमेदवारांना छावणी पोलिसांनी बुधवारी (ता. नऊ) अटक केली. संबंधित कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  

औरंगाबाद - बनावट रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या ३७ उमेदवारांना छावणी पोलिसांनी बुधवारी (ता. नऊ) अटक केली. संबंधित कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  

या प्रकरणात छावणीचे कर्नल मोहनपाल सिंग यांनी तक्रार दिली. तक्रारीत, २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबादेत भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता. या मेळाव्यात कर्नल मोहनपाल सिंग यांच्याकडे औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जालना, जळगाव, नांदेड, नंदुरबार, परभणी अशा नऊ जिल्ह्यांचा पदभार होता. दरम्यान, २१ जुलै २०१५ ते ६ ऑगस्ट २०१५ रोजी सैन्य भरती प्रक्रिया सुरू होती. त्यात प्रथम लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेत एक हजार ५० उमेदवार उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणीत उमेदवारांकडून वयाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र (टीसी), अविवाहित प्रमाणपत्र, वर्तणूक प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या सत्यप्रती घेण्यात आल्या. त्यानंतर सैन्य भरतीतील अधिकाऱ्यांनी उमेदवारांचे कागदपत्रे तपासली. त्यात एक हजार ५० पैकी ४३ उमेदवारांच्या अधिवास प्रमाणपत्रांबाबत संशय आल्याने त्या उमेदवारांची अधिवास प्रमाणपत्र संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. यात संबंधित उमेदवारांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्रे ही बनावट असून त्यावर संबंधित तहसीलदारांचे बनावट सही व शिक्के मारल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणात कर्नल मोहनपाल सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४३ जवांनाविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयितांना केली अटक
प्रकरणात पोलिसांनी तपास करून राहुल यादव (जठारवाडी, कोल्हापूर), अक्षय गोसावी (शाहूवाडी, कोल्हापूर), विकास भोसले (राधानगरी, कोल्हापूर), रोहित नीले (करवीर, कोल्हापूर), आशुतोष कोरे (हातकंगले, कोल्हापूर), अमित मुळीक (हातकंगले, कोल्हापूर), नामदेव साळुंके (वालेखिंडी, सांगली), संदीप गायकवाड (आटपाडी, सांगली), विशाल शिरसोडे (खानापूर, सांगली), भारत माळी (कवळापूर, सांगली), सागर येयगारे (भिरज, सांगली), गणेश खिल्लारे (करमणी, सांगली), सागर सपकाळ (अंबाडे, सातारा), रोहित यादव (खटाव), शुभम कर्पे (खोरजईवाडी, सातारा) यांच्यासह ३७ संशयित उमेदवारांना अटक केली. तर उर्वरित सहा संशयितांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
संशयित आरोपींना गुरुवारी (ता. १०) औरंगाबाद येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी पोलिसांनी युक्तिवाद करून संशयितांनी बनावट प्रमाणपत्र कोठून आणि कोणाकडून तयार करून घेतले याचा तपास, बनावट कागदपत्रांवर मारलेले शिक्के आणि संगणक जप्त करणे आहे. त्यांच्या साथीदारांना अटक करणे आहे. त्यांनी पूर्वनियोजित कट रचून हा गुन्हा केला आहे. त्यांना विश्‍वासात घेऊन पुरावे हस्तगत करणे असल्याने त्या उमेदवारांना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. विनंती मान्य करून न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

Web Title: aurangabad news crime