पतीच्या पॅरोलसाठी मंगळसूत्र ठेवले गहाण! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - कारागृहातील पती संचित रजेवर सुटावा म्हणून जिवाचे रान केले. एकजण भेटला, पतीला सोडवण्याचे सांगत पैशांची मागणी केली. पैसे नव्हते; पण पती सुटावा म्हणून तिने स्वत:चे मंगळसूत्र व अन्य दागिने त्या व्यक्तीजवळ गहाण ठेवले; पण तो दगा देऊन पसार झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. 10) घडला. पसार संशयित भामट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी (ता.) अटक केली. 

औरंगाबाद - कारागृहातील पती संचित रजेवर सुटावा म्हणून जिवाचे रान केले. एकजण भेटला, पतीला सोडवण्याचे सांगत पैशांची मागणी केली. पैसे नव्हते; पण पती सुटावा म्हणून तिने स्वत:चे मंगळसूत्र व अन्य दागिने त्या व्यक्तीजवळ गहाण ठेवले; पण तो दगा देऊन पसार झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. 10) घडला. पसार संशयित भामट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी (ता.) अटक केली. 

शेख आयूब शेख दगडू (वय 45, रा. आडूळ ता. पैठण) असे संशयित भामट्याचे नाव आहे. लताबाई सुरेश पवार ढोकी (ता. कळंब, जि. उस्मानाबद) येथे राहतात. तीन वर्षांपासून त्यांचे पती हर्सूल कारागृहात आहेत. त्यांना संचित रजा (पॅरोल) मिळावा म्हणून त्या आटोकाट प्रयत्न करीत आहेत. याच कामासाठी त्या गुरुवारी जिल्हा न्यायालयात आल्या. त्या वेळी पांढरा सदरा व काळी पॅंट घातलेल्या शेख आयूबने लताबाईंना हेरले व त्यांना अडचण विचारली. त्यांनी आयूबला मोठ्या विश्‍वासाने सारी सबब सांगितली. हीच बाब हेरून आयूबने ""तुमच्या पतीला सोडवून देण्याबाबत ऑर्डर करून देतो, या बदल्यात 25 हजार रुपये द्यावे लागतील'' अशी लताबाई यांच्याकडे मागणी केली; पण पैसे नसल्याचे त्यांनी आयूबला सांगितले. तेव्हा पैसे नसतील तर दागिने गहाण ठेवा असे सांगितले. पती संचित रजेवर सुटावा म्हणून लताबाईंनी ही बाबही मान्य केली. भामट्याला लताबाईंकडून दागिने मिळाल्यानंतर त्याने बनावट खटाटोप करून आयूबने लताबाई यांना हर्सूल कारागृहाजवळ नेले. तेथे मित्राला भेटतो, असे सांगून धूम ठोकली. 

पदरचे दागिनेही नेले 
पैसे नसतील तर दागिने द्या व चार दिवसांनी पैसे देऊन दागिने घेऊन जा, असे आयूबने लताबाई यांना सांगितले. त्यानंतर भामट्याने लताबाई यांना हर्सूल कारागृहात नेत तेथील टपाल बॉक्‍समध्ये साहेबांची स्वाक्षरी घेतल्याचे भासवून आत कागद टाकला. "तुमचा माणूस चार वाजता सुटेल, मी गेटवर जाऊन येतो' असे सांगत आयूब पसार झाला. 

पती न सुटल्याने हतबल 
पतीची वाट पाहताना कारागृहातील कर्मचाऱ्याने त्यांना विचारणा केली. सर्व सबब सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने टपाल बॉक्‍स उघडून लताबाई यांना बोलावून घेतले. कागदावर फक्त सुरेश पवार लिहले असून तुमची फसवणूक झाल्याचे त्यांनी लताबाई यांना सांगितले. पती तर सुटलाच नाही; पण हातचे दागिने गेल्याने त्या हतबल झाल्या. 

मुसक्‍या आवळल्या 
फसवणूक झालेल्या लताबाई यांनी क्रांती चौक ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी वर्णनावरून, तसेच तपास करून आयूबला ताब्यात घेतले. त्याने फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. 16) पोलिस कोठडी सुनावली. 

Web Title: aurangabad news crime