संजय कासलीवालविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - बंगलोज्‌पोटी ग्राहकाने दिलेली अनामत रक्कम हडपल्याप्रकरणी शहरातील बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध मंगळवारी (ता. २९) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

औरंगाबाद - बंगलोज्‌पोटी ग्राहकाने दिलेली अनामत रक्कम हडपल्याप्रकरणी शहरातील बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध मंगळवारी (ता. २९) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

प्रतिभा रत्नदीप भिडे-खोब्रागडे (रा. बुलडाणा) यांची संजय कासलीवाल यांनी फसवणूक केली. याबाबत त्यांनी तक्रार दिली की, १८ सप्टेंबर २०१४ ला ‘कासलीवाल निवारा’ या विमानतळासमोरील नवीन वसाहतीची जाहिरात वाचून त्यांनी माहिती घेतली. यानंतर २५ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांच्यासोबत त्यांच्या आई इंदुमती भिडे व वडील मनोहर भिडे यांनी साईटला भेट दिली. त्यावेळी कासलीवाल निवारा या साईटचे बांधकाम सुरू होते. साईट पसंत पडल्यानंतर प्रतिभा भिडे या अपना बाजार येथील कासलीवाल यांच्या कार्यालयात गेल्या. तिथे त्यांना बंग्लोजबाबत माहिती देण्यात आली. थ्री बी. एच. के. रो बंग्लोजची ७१ लाख रुपये किंमत आहे. बुकिंगसाठी पाच लाख रुपये आवश्‍यक असल्याची बाब त्यांना सांगण्यात आली. उर्वरित रक्कम भरणा करण्याबाबत प्रकल्पाचे मालक संजय कासलीवाल यांना भेटण्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर श्रीमती भिडे यांनी संजय कासलीवाल यांची भेट घेतली. त्या वेळी ‘‘पाच लाख रुपये रोख भरा, कर्ज मंजूर करून बाकीचे पैसे दिल्यानंतर तुम्हाला घराची रजिस्ट्री चालू बांधकामामध्ये तुमच्या नावावर करून देतो आणि तुम्हाला बुकिंगपासून सहा महिन्यांत बंग्लोज पूर्ण करून ताबा देतो’’ असे आश्‍वासन त्यांनी श्रीमती भिडे यांना दिले. यावर विश्‍वास ठेवून पाच लाख रुपये भरले. याबाबत कासलीवाल यांच्याकडून पावतीही देण्यात आली; मात्र सहा महिने, वर्ष उलटल्यानंतरही बंग्लोजचे बांधकाम पूर्ण झाले नाही. 

खोटी आश्‍वासने
काम पूर्ण करून ताबा मिळावा म्हणून श्रीमती भिडे व त्यांच्या पतीने संजय कासलीवाल यांच्याकडे अनेकदा खेटे मारले. तसेच ताबा नसेल तर पैसे परत मागितले; पण खोटी आश्‍वासने देऊन कासलीवाल यांनी वेळ निभावली. याविरोधात श्रीमती भिडे यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: aurangabad news crime