"ई-सेंटर'च्या नावाखाली 50 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - "महा ई-सेंटर' या नावाने संकेतस्थळ तयार करून एक वर्षांपासून महाठगाने आधारकार्ड, मतदान कार्डसह विविध सरकारी योजना व तिकीट; तसेच इतर सुविधांची एजन्सी देण्याच्या नावाने देशातील 80 जणांना गंडा घातला. यातून "इझी बिल गेट-वे'द्वारे त्याने तब्बल 50 लाख रुपये हडपल्याची माहिती समोर आली आहे. या भामट्याला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली. 

शेखर ओमप्रसाद पोद्दार (वय 32, रा. जरीपटका, नागपूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह अन्य एका व्यक्तीने "महा ई-सेंटर' या नावाने संकेतस्थळ तयार केले. यात "जीएसटी', "आयआरसीटीसी', "मनी ट्रान्सफर', रेल्वे, विमान तिकीट, आधारकार्ड व मतदानकार्डसह कथित विविध सरकारी कामांची एजन्सी देण्यासाठी पोद्दारने नागरिकांना मोबाईलवर "एसएमएस' पाठविले. त्यात संपर्क क्रमांक व एजन्सी देण्याबाबत माहिती देण्यात आली होती. या क्रमांकांवर विश्‍वास ठेवून नागरिकांनी संपर्क केला. त्या वेळी त्याने प्रत्येकाकडून "इझी बिल गेट-वे'द्वारे 15 हजारांची मागणी केली. 

एजन्सी घेऊ इच्छिणाऱ्यांनी ही रक्कम ऑनलाइन भरली. मात्र, अनेक दिवस उलटूनही भामट्याकडून प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे एजन्सी घेऊ इच्छिणाऱ्यांनी संकेतस्थळावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, तोही बंद होता. औरंगाबादच्या वदोड बाजार येथील रमेश कुलकर्णी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे तक्रार दिली. 

ग्रामीण सायबर विभागाने शेखर पोद्दार याला नागपूर येथील घरातून अटक केली. 

संशयित शेखर पोद्दारविरुद्ध उत्तर प्रदेशात दोन, नागपुरात एक व औरंगाबादेत एक असे चार गुन्हे नोंद आहेत. त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून संकेतस्थळाद्वारे देशात 80 जणांची फसवणूक केली व आतापर्यंत 50 लाख रुपये हडपल्याची माहिती समोर आली असून, त्याला उत्तर प्रदेश पोलिस चौकशीसाठी नेणार आहेत. 
- डॉ. आरती सिंह,  पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण 

Web Title: aurangabad news crime