अखेर ठगाला बेड्या! 

अखेर ठगाला बेड्या! 

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) औषधी विभागात लिफ्टमन असलेल्या राजेंद्र चरणसिंग पोहाल याचे बिंग अखेर फुटले. घाटीत नोकरीचे स्वप्न दाखवून दोघांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन हाती बनावट नियुक्तिपत्र दिल्याचे उघड होताच त्याच्यावर गुन्हा नोंद झाला असून, मंगळवारी (ता. 24) त्याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या रॅकेटची "सकाळ'ने पोलखोल केली होती. 

घाटी रुग्णालयात होतकरू, गोरगरीब व बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब "सकाळ'ने उघडकीस आणली होती. घाटीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनीही राज्यभरात असे गैरप्रकार होत असल्याचे घाटी प्रशासनाला कळवले होते. तसेच विधिमंडळातही माजी मुख्यमंत्र्यांनी लक्षवेधीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे घाटी प्रशासनाने फसगत झालेल्यांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले होते. "सकाळ'ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यामुळे फसवणूक झालेल्या 12 जणांपैकी दोघांच्या तक्रारी घाटी प्रशासनाला प्राप्त झाल्या. यानंतर डॉ. सुधीर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली गोपनीय चौकशी समिती नेमण्यात आली. डॉ. सुरेश हरबडे, डॉ. जिरवणकर यांचा या समितीत समावेश होता. नऊ ऑक्‍टोबर व 16 ऑक्‍टोबरला या बैठकीला दोन तक्रारदारांपैकी एकच तक्रारदार हजर होता. या तक्रारी आणि बोगस नियुक्तिपत्राची पडताळणी समितीने केली. यात फसवणूक झाल्याची बाब स्पष्ट झाली. यात गुन्हा नोंद झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोहाल याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आणखी दोन तक्रारी घाटी प्रशासनाकडे आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. 

चेहऱ्यामागचा मोहरा कोण? 
घाटीतील कॉर्टरमध्ये राहणाऱ्या राजेंद्र पोहालला अटक झाली; मात्र यामागे तो एकटाच नसून अनेकांचे हात फसवणुकीत बरबटले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात चतुर्थश्रेणीच्या भरतीतही अशीच बोगसगिरी समोर येऊन त्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्‍यता असल्याची बाब सूत्रांकडून सांगण्यात आली. 

सरकारी नोकरीची आशा 
आयटीआय करून एका कंपनीत काम करणाऱ्या किशोर दिनकर वाघ याला 1 जून 2017 ला सात दिवसांत सफाईगार पदावर रुजू होण्याचे बनावट पत्र देऊन त्याच्या वडिलांकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले; तर त्याचा मावसभाऊ अंकुश नामदेव घुगे याच्याकडूनही कक्षसेवक पदाचे नियुक्तिपत्र देऊन दोन लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले; पण पैसे परत मिळत नसल्याचे पाहून त्यांनी तक्रार दिली. भरतीसाठी व्याजाने पैसे घेऊन देण्यात आल्याचे फसवणूक झालेल्यांच्या नातेवाइकांनी "सकाळ'ला सांगितले. 

तत्कालीन अधिष्ठातांच्या बनावट सह्या 
नियुक्तिपत्र खरे भासवण्यासाठी ठगाने महाविद्यालय व घाटी रुग्णालयाच्या नकली शिक्‍क्‍यांचा वापर केला; परंतु वेगवेगळ्या आस्थापनांचा एकत्रित वापर केल्याने नियुक्तिपत्राचा फोलपणा उघड झाला. त्यामुळे या लोकांना नियुक्त करून घेण्यात आले नाही. शिवाय या पत्रावर वेगवेगळ्या आस्थापनांचा जावक क्रमांक एकत्रित केल्याचे दिसते, असे अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या बनावट सह्या या पत्रावर आहेत. या मजकुराचे लेखन हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com