रिक्षातून उडी मारून तरुणीने  करून घेतली स्वतःची सुटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - रिक्षाचालकाकडून आपले अपहरण होत असल्याचे लक्षात येताच एका महाविद्यालयीन तरुणीने प्रसंगावधान राखत रिक्षातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. हा प्रकार बीड बायपास रस्त्यावर एमआयटी कॉलेजच्या सिग्नलजवळ मंगळवारी (ता. एक) घडला.

अपहरणाचा प्रयत्न झालेली ही तरुणी देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेते. मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता कॉलेज संपल्यानंतर ती नक्षत्रवाडी भागात आपल्या घरी जाण्यासाठी चालत रेल्वेस्टेशनवर आली. ३.३० वाजेच्या सुमारास ती नक्षत्रवाडीकडे जाण्यासाठी एकटीच रिक्षात (एमएच- २०, बीटी- ८८१५) बसली. रिक्षाचालक रेल्वेस्टेशनहून निघाला. पुढे महानुभव आश्रम चौकात आल्यानंतर चालकाने रिक्षा एमआयटी कॉलेजच्या दिशेने वळविली. त्यामुळे तरुणीने त्याला हटकले; मात्र दोन सीट घेऊन येतो, असे सांगून त्याने रिक्षा पुढे नेली. एमआयटी कॉलेजच्या सिग्नलजवळ रिक्षा आली तरी तो सीट घेण्यासाठी थांबला  नाही. त्यामुळे तरुणीला आपले अपहरण होत असल्याचे लक्षात आले. तिने प्रसंगावधान राखून रिक्षातून उडी मारली. त्यात मार लागल्याने ती काही काळ बेशुद्ध पडली. दरम्यान, पोलिसांनी तिला घाटी रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार केले, असे या तरुणीने सातारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार रिक्षाचालक संजय संपतराव चौधरी (रा. गारखेडा, चित्तेपिंपळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: aurangabad news crime youth