औरंगाबादेतील इंधन डेपोला पेट्रोलियम मंत्र्यांची मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - वाढत्या औरंगाबाद शहराची पानेवाडी इंधन डेपोवरील निर्भरता आता संपुष्टात येणार आहे. शेंद्रा येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत ऑईल डेपो उभारण्याच्या दीर्घकालीन मागणीला केंद्रीय इंधन आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेतील इंधन विक्रेत्यांच्या संघटनेसह लावून धरलेल्या बारा वर्षे जुन्या मागणीला बुधवारी (ता. 9) यश आले. 

औरंगाबादेतील इंधन डेपो हटविल्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड, नगर (नेवासा), धुळे आदी जिल्ह्यांमधील इंधन विक्री करणाऱ्या पंपांना मनमाड येथे असलेल्या पानेवाडी येथील इंधन डेपोवर निर्भर राहावे लागते. आता ही निर्भरता संपुष्टात येणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत इंधन डेपो उभारण्याच्या मागणीला धर्मेंद्र प्रधान यांनी मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि या प्रकल्पाचे काम हाती घेण्याचे आदेश दिले. तीनही इंधन कंपन्यांच्या एकत्रितपणे होणाऱ्या या इंधन डेपोच्या कामाची जबाबदारी एचपीसीएलचे अध्यक्ष एम. के सुराणा यांच्याकडे सोपविली आहे. यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशीही बोलणे करण्यात आले असून, रेल्वेच्या जागेतून यासाठीची पाईपलाईन टाकली जाण्याची शक्‍यता आहे. 

उद्योगांनाही डेपो फायद्याचा 
औरंगाबादलगतच्या शेंद्रा येथील औद्योगिक वसाहतीत होणारा हा इंधन डेपो उद्योगांसाठी लागणाऱ्या लाखो लिटर इंधनाचा पुरवठाही सहज करू शकणार आहे. ऑटो इंडस्ट्री हबलाही याचा फायदा होईल. याशिवाय यावर निर्भर असलेले अनेक उद्योग येथे फोफावतील. त्यामुळे रोजगारालाही चालना मिळणार आहे. पानेवाडी येथून इंधन आणण्यासाठी होणारा आर्थिक खर्च वाचून, वेळेचा अपव्यय टळेल. या डेपोच्या उभारणीसाठी सुमारे शंभर एकर जागा आणि तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

धर्मेंद्र प्रधान यांनी या मागणीची दखल घेत शेंद्रा येथे डेपो सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. मराठवाड्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये इंधन पोहोचविण्यासाठी तेल कंपन्यांना करावा लागणारा खर्च यामुळे वाचणार आहे. यासाठी शेंद्रा येथे जागा उपलब्ध आहे. 
- चंद्रकांत खैरे (खासदार) 

औरंगाबादेत हा डेपो होणे ही काळाची गरज होती. येथील उद्योगांनाही त्याचा फायदा होणार आहे. कंपन्यांना लागणारे इंधन येथे उपलब्ध होणार असल्याने नव्या उद्योगांना आणण्यासाठी हा डेपो महत्त्वाची भूमिका बजावेल. 
- अखिल अब्बास (सचिव, औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशन) 

Web Title: aurangabad news Dharmendra Pradhan