सरस्वती भुवनचे अध्यक्ष दिनकर बोरीकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद - हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर (वय 83) यांचे मंगळवारी (ता. 16) वृद्धापकाळाने निधन झाले. एक व्रतस्थ गांधीवादी हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली लढणारे खंदे स्वातंत्र्यसैनिक श्रीनिवासराव बोरीकर यांचे सुपुत्र असलेले प्रा. बोरीकर यांना घरातूनच देशप्रेम आणि गांधीवादाचे बाळकडू मिळाले.

उमेदीच्या काळात हैदराबादला सेंट्रल को ऑपरेटिव्ह युनियनच्या "सहकार समाचार' या वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले. स्वातंत्र्यानंतर औरंगाबादला सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. निवृत्तीनंतर संस्थेचे सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, तसेच हैदराबादच्या स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियल या संस्थांचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले. "साम्ययोग' या साप्ताहिकाचे संपादकपद सांभाळलेल्या प्रा. बोरीकर यांनी अनेक वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन केले. त्यांची जगावं तर असंच, यशस्वी पालकत्वाची गुपिते, शिवांबू साधना, आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या "रविवारच्या शोधात' या बाल एकांकिकेला राज्य शासनाचा "शाहीर अमर शेख पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले होते. 

आज अंत्यदर्शन, अंत्यसंस्कार
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (ता. 17) सकाळी 9 ते 10 यावेळेत प्रा. बोरीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. संस्थेअंतर्गत सर्व शाळा आणि महाविद्यालये एक दिवस बंद ठेवली जातील, असे कळवण्यात आले आहे.

Web Title: aurangabad news dinkar borikar death