औरंगाबाद: विभागीय आयुक्‍तांच्या सूचनांनाही केराची टोपली

राजेभाऊ मोगल
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मराठवाड्यातील प्रश्‍नांबाबत चर्चा करून त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. यासंबंधी 69 विभागांना पत्रव्यवहार करून 29 ऑगस्टपर्यंत आपापल्या कार्यालयांचे प्रस्ताव पेनड्राइव्ह, तसेच छापील स्वरूपात पाच प्रतींत पूरक टिप्पणीसह सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

औरंगाबाद : मंत्रिमंडळाच्या संभाव्य बैठकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्‍तांनी केलेल्या सूचनांना अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. या संदर्भात विविध विभागांकडून मागण्यांचे प्रस्ताव मागविले. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत केवळ पाचच विभागांनी प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती शुक्रवारी (ता. एक) बैठकीत समोर आली. 

मराठवाड्यातील प्रश्‍नांबाबत चर्चा करून त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. यासंबंधी 69 विभागांना पत्रव्यवहार करून 29 ऑगस्टपर्यंत आपापल्या कार्यालयांचे प्रस्ताव पेनड्राइव्ह, तसेच छापील स्वरूपात पाच प्रतींत पूरक टिप्पणीसह सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्ह्याची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, परिस्थिती, मूलभूत गरजा, अत्यावश्‍यक सेवा, मानव विकास निर्देशांक या सर्व बाबींचा विचार करून आपल्या खात्याच्या योजना सुचवाव्यात; तसेच लोकप्रतिनिधींकडून प्राप्त सूचनांचाही त्यामध्ये विचार करावा.

जिल्हास्तरावरून शिफारस झालेले प्रस्ताव संबंधित विभागाच्या प्रादेशिक कार्यालयप्रमुखांनी छाननी करून अभिप्रायांसह सादर करावेत; तसेच प्रस्ताव सादर करताना सहा महिन्यांत पूर्ण होणारे प्रकल्प, कामे, एक वर्षात पूर्ण होणारे प्रकल्प, दोन वर्षांत पूर्ण होणारे प्रकल्प, दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागणारे प्रकल्प अशी वर्गवारी करण्यात यावी, अशा सूचनांचा समावेश होता. मात्र, केवळ पाच विभागांनीच प्रस्ताव पाठविल्याची बाब शुक्रवारी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतलेल्या बैठकीत पुढे आली. यामुळे विभागातील अधिकाऱ्यांवर डॉ. भापकर यांचा वचक नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्रिमंडळासारख्या महत्त्वाच्या बैठकीच्या अनुषंगाने मागविण्यात आलेल्या प्रस्तावासही अधिकारी दाद देत नाहीत, हे उपस्थित अन्य अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मंत्रिमंडळ आणि प्रस्ताव यावर फारशी चर्चाच झाली नसल्याचेही सांगण्यात आले. 

राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत मराठवाड्याचाही विकास व्हावा, यासाठी येथील अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेतली जात असे. मात्र, 2009 नंतर चक्‍क आठ वर्षांच्या कालावधीनंतर गतवर्षी 4 ऑक्‍टोबर 2016 रोजी बैठक झाली. त्यानंतर यावर्षीही बैठक घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. याअनुषंगाने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. दरम्यान, येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे. या कार्यक्रमानंतर विविध प्रश्‍नांचा, मागण्यांचा आढावा घेतला जाण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. या बैठकीस विभागीय पातळीवरील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Aurangabad news divisional commissioner in aurangabad