फटाक्‍यांनी उजळला आसमंत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - ‘‘सुख-समृद्धी, ऐश्‍वर्य आणि धनसंपदा लाभू दे!’’ अशी मनोभावे प्रार्थना करीत घरोघरी गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन झाले. व्यवसाय-उद्योग,कार्यालयांच्या ठिकाणी लक्ष्मीची पूजा-अर्चा करण्यात आली. 

औरंगाबाद - ‘‘सुख-समृद्धी, ऐश्‍वर्य आणि धनसंपदा लाभू दे!’’ अशी मनोभावे प्रार्थना करीत घरोघरी गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन झाले. व्यवसाय-उद्योग,कार्यालयांच्या ठिकाणी लक्ष्मीची पूजा-अर्चा करण्यात आली. 

दिवाळीमध्ये नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला विशेष महत्त्व असते. लक्ष्मीपूजन असल्याने सकाळी नागरिकांनी बाजारपेठेत आवश्‍यक पूजा-साहित्य खरेदीसाठी गर्दी केली. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी सर्वत्र लगबग सुरू होती. ठिकठिकाणी साफसफाई करून झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या. व्यापारी वर्गाने पारंपरिक वेशभूषेत भक्तिभावाने सहकुटुंब लक्ष्मीची पूजा केली. सायंकाळी फटाक्‍यांच्या आतषबाजीत संपूर्ण आसमंत उजळून निघाला. आवाजाचे फटाके फुटण्याचे प्रमाण यंदा घटले. मात्र, आकाश उजळून टाकणाऱ्या फटाक्‍यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. हवा आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी शासनानेही बंधने आणली आहेत. त्यामुळे चार वर्षांत फटाक्‍यांच्या खरेदीत घट होऊ लागली आहे, असे विक्रेते ओंकार जाधव यांनी सांगितले.

सुख, शांती, समृद्धी, समाधान, ऐश्‍वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होईल, हा आत्मविश्‍वास लक्ष्मीच्या साक्षीने जागवत चैतन्याचा अमृतमयी सोहळा असणाऱ्या दिवाळीचा आनंद घरोघरी लुटण्यात आला. आनंद असेल आज प्रत्येक क्षणात, आनंद असेल प्रत्येक मनात, याच भावनेतून एरवीची अवघी दु:खे बाजूला सारून लक्ष्मीपूजनाचा आनंद लुटत नवे सुखक्षण वेचण्यासाठी सर्वजण सज्ज झाले. पहाटेपासूनच सुगंधी तेल, उटण्यांनी अंघोळ, औक्षण, नवीन कपडे परिधान करून फटाके उडविण्याची लहानग्यांची धावपळ आणि त्यानंतर चमचमीत फराळावर यथेच्छ ताव, अशी धांदल घरोघरी सुरू राहिली. सायंकाळी आकाशातील काळोखाची जागा आसमंत उजळविणाऱ्या हळुवार दीपमाळांनी घेतली. आकाश कंदील लागले आणि तयारी सुरू झाली लक्ष्मीपूजनाची. लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करून ऐश्‍वर्य-आरोग्यासाठी घराघरांत पूजा झाली. घरातल्या कर्त्यांनी पारंपरिक वेशात लक्ष्मीपूजेचा मुहूर्त साधला. व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी वही, चोपडी व लक्ष्मीपूजन केले. अनेकांनी लॅपटॉपवर ‘पूजाविधी’ डाऊनलोड करून विधिवत पूजेचा आनंद घेतला. एकमेकांना शुभेच्छांची मनमोकळी देवाणघेवाण झाली. 

Web Title: aurangabad news diwali festival