रस्त्यावरील स्वस्त बिर्याणीत कुत्र्याचे मांस? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017


नसबंदी नसल्यामुळे वाढली संख्या 
नसबंदी बंद केल्याने शहरातील कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सध्या शहरात चाळीस हजारांहून अधिक कुत्रे आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हाच एकमेव उपाय आहे; परंतु औरंगाबादेत दोन वर्षांपासून नसबंदी बंद आहे, असे श्रीमती मथराणी म्हणाल्या. 

औरंगाबाद : शहर परिसरात कुत्र्यांच्या मुंडक्‍याच्या कवट्या आढळून येत आहेत. कुत्रे मारून त्यांचे मांस रस्त्यावर स्वस्तात मिळणाऱ्या बिर्याणीमध्ये वापरले जात असावे, अशी शंका केंद्रीय पशुकल्याण बोर्डाच्या अधिकारी मेहर मथराणी यांनी सोमवारी (ता. 25) व्यक्‍त केली. या बिर्याणीचे नमुने घेऊन तातडीने तपासणी केली पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. 

शहरात कुत्रे जाळ्याऐवजी फास लावून पकडण्यात येत असल्याची तक्रार केंद्रीय पशुकल्याण बोर्डाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बोर्डाने महापालिकेला सूचना देऊन कुत्र्यांचा फास बंद करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, श्रीमती मथराणी यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या सूचनेनुसार कुत्र्यांची नसबंदी, त्यांना पकडण्याची पद्धत, कुत्र्यांची नागरिकांनी घ्यायची काळजी, त्यासाठी असलेले नियम याची माहिती देण्यासाठी महापालिकेला भेट दिली. आयुक्‍त दीपक मुगळीकर, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता गजानन मनगटे यांची त्यांनी भेट घेतली. महापालिकेच्या डॉग स्क्‍वॉडसोबत जाऊन कुत्रे कसे पकडतात याची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

मथराणी म्हणाल्या, की शहरात कुत्र्यांची केवळ मुंडकी आढळत असल्याचे श्री. बारवाल यांचे म्हणणे आहे. त्याचा आधार घेत हे धोकादायक असल्याचे नमूद करून त्यांनी कुत्र्यांच्या मांसाचा वापर रस्त्यावर स्वस्तात मिळणाऱ्या बिर्याणीमध्ये केला जात असवा, अशी शंका व्यक्त केली. रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त बिर्याणीचे नमुने तपासावेत, अशी सूचना करणार आहोत. कुत्र्यांनाही योग्य वागणूक मिळाली पाहिजे. त्यांची हत्या करणे किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करणे चुकीचे आहे. 

नसबंदी नसल्यामुळे वाढली संख्या 
नसबंदी बंद केल्याने शहरातील कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सध्या शहरात चाळीस हजारांहून अधिक कुत्रे आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हाच एकमेव उपाय आहे; परंतु औरंगाबादेत दोन वर्षांपासून नसबंदी बंद आहे, असे श्रीमती मथराणी म्हणाल्या. 

वर्तणुकीत होतो बदल 
शिवाय सध्या महापालिकेचे पथक एका भागातील कुत्रे पकडून दुसऱ्या भागात नेऊन सोडते. नियमानुसार हे चुकीचे आहे. त्या त्या भागातील कुत्रे तेथील लोकांना ओळखत असतात; परंतु दुसऱ्या भागात त्यांना नेऊन सोडल्यास तेथे त्यांच्या वर्तणुकीत बदल होतो. शिवाय अनोळखी वातावरण असल्याने ते भीतीपोटी अंगावर धावून जातात. म्हणून महापालिकेने पकडून आणलेले कुत्रे नसबंदीनंतर त्याच भागात सोडले पाहिजेत. त्याबाबत आयुक्‍तांना आम्ही सूचना दिल्या आहेत, असे मथराणी यांनी सांगितले. 

Web Title: Aurangabad news dog meat in biryani