कुत्री पकडण्याच्या पद्धतीची केंद्रीय मंत्र्यांकडून दखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी महापालिकेला पत्र पाठविले आहे. कुत्री पकडताना फास टाकणे ही क्रूर पद्धत असून, नियमांची अंमलबजावणी करण्याची तंबी त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर खासदार पूनम महाजन यांनीदेखील या संदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. 

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी महापालिकेला पत्र पाठविले आहे. कुत्री पकडताना फास टाकणे ही क्रूर पद्धत असून, नियमांची अंमलबजावणी करण्याची तंबी त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर खासदार पूनम महाजन यांनीदेखील या संदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. 

औरंगाबादेतील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारीवरून कुत्री पकडताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. त्यात आता कुत्र्यांना पकडण्याच्या पद्धतीवरच थेट मंत्री, खासदार यांनी आक्षेप घेतल्याने महापालिका अडचणीत सापडली आहे. महापालिकेचे कर्मचारी मोकाट कुत्र्यांना फासात अडकवून पकडत होते. मात्र, फासात अडकलेले कुत्रे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपड करते. त्यात त्याला जखमा होतात. अनेक वेळा फास आवळला जाऊन कुत्र्यांचा जीव जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे या पद्धतीने कुत्री पकडण्यास ऍनिमल वेल्फेअर बोर्डाने बंदी घातली आहे. मात्र, औरंगाबाद शहरात याच पद्धतीने कुत्र्यांना पकडण्यात येत होते. दोन महिन्यांपूर्वी एका कुत्र्याच्या गळ्याऐवजी पायात फास अडकल्याचा व्हिडिओ एका तरुणाने "वेल्फेअर बोर्डा'कडे पाठविला होता. त्यानुसार बोर्डाने महापालिकेला पत्र देऊन फास टाकून कुत्री पकडण्याची पद्धत तत्काळ बंद करावी, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर देखील काही ठिकाणी नगरसेवकांच्या दबावामुळे महापालिका कर्मचारी याच पद्धतीने कुत्र्यांना पकडत असल्याची नव्याने तक्रार करण्यात आली. त्यानंतर मात्र केंद्रीय मंत्री व प्राण्यांसाठी काम करणाऱ्या मेनका गांधी यांनी दखल घेऊन महापालिकेला कुत्री पकडताना नियमांची अंलबजावणी करा, अशी तंबी दिली आहे. त्याचबरोबर खासदार पूनम महाजन, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या "पेटा' या संघटनेने देखील या संदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. 

कार्यशाळा घेणार  
महापालिकेच्या वतीने कुत्री पकडण्यासाठी व त्यांची नसबंदी करण्यासाठी खासगी संस्थांना काम देण्यात येत होते. मात्र, ऍनिमल वेल्फेअर बोर्डाकडे नोंद असलेल्या संस्थेलाच हे काम देणे बंधनकारक आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथील "ऍनिमल वेल्फेअर'च्या अधिकारी मेहेर मथराणी पाठपुरावा करीत आहेत. त्या औरंगाबादला येणार असून; कर्मचारी, अधिकारी व नगरसेवकांसाठी त्या कार्यशाळा घेणार आहेत, असे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news dog menka gandhi