कुत्र्याचा धुमाकूळ, ५३ जणांना चावा!

कुत्र्याचा धुमाकूळ, ५३ जणांना चावा!

औरंगाबाद - सिडको एन-नऊमधील एम-दोन परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे ४० जणांना चावा घेतल्याने सोमवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एकच धावपळ उडाली. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या भागांत कुत्र्यांनी दिवसभरात १३ जणांना चावा घेतला. यातील बहुतांश जणांनी घाटीत तर  काहींवर खासगी दवाखान्यांत उपचार करण्यात आले आहेत. 

यासंदर्भात नगरसेवक नितीन चित्ते म्हणाले, पांढऱ्या छोट्या कुत्र्याने पवननगर भागात नागरिकांना चावे घेतले. त्यानंतर तो एम-दोन, रायगडनगर, प्रतापगडनगर, अयोध्यानगरात धावत सुटला. प्रत्येक भागात त्याने नागरिकांना चावे घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याला पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र ते फोल ठरले. महापालिकेची गाडी रात्री साडेदहापर्यंत आली नव्हती, असे काही नागरिकांनी सांगितले. 

घाटीतील डॉक्‍टरांनी सांगितले, ‘लेव्हल थ्री’चा चावा घेतलेल्यांना तातडीने लसीकरण करीत आहोत. सर्व धोक्‍याबाहेर आहेत. घाटीत आलेल्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख सरफराज सय्यद इस्माईल यांनी सांगितले. कचरा साचल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांचे टोळके पाठलाग करत असल्याने दुचाकीस्वार पडण्याच्या आणि चाव्यांच्या घटना वाढत आहेत. कुत्र्यांच्या बंदोबस्तात महापालिका कमी पडत असल्याचे घाटीत आलेले काही नातेवाईक सांगत होते. खासगी दवाखान्यात डॉ. राजेश गुजराती यांनीही काहींवर उपचार केले.  

‘एआरव्ही’चा तुटवडा
महापालिका रुग्णालयांत अँटी रेबिज लसींचा तुटवडा होता. एआरव्ही, एआरएस इंजेक्‍शन उपलब्ध होऊ शकले नाही तर घाटीतही तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ उडाली. काहींनी घाटीत इंजेक्‍शन उपलब्ध करून दिली तर काहींनी खासगीरीत्या खरेदी केली. 

जखमींची नावे - वरद चव्हाण (वय ९), सृष्टी जिखाने (२), दिव्या जाधव (९), आयेशा कोतवाल (७), अथर्व काळे (६), युवराज खंडागळे (१०), पौर्णिमा पाटील (७), आर्यन सोनवणे (३), संदेश खरात (७), हेमंत बंडे (११), अरव शेटे (३), सुशील मांडगे (९), पृथ्वी राजपूत (९), आयुष देशपांडे (६), चैताली मांडगे (९), ल्युऑन सय्यद (४), शुभम वाहुळे (१२) या चिमुकल्यांसह पूजा डोईफोडे (३०), शफिक शेख (२६), अंजली भावसार (२८), प्रतीक तोटकर (१७), अमोल कर्डिले (२६), शैला गाडेकर (५९), सुनील चव्हाण (२२), मथुरा के. (४०), प्रमोद बरीदे (३०), प्रगती वाहुळे (१७), शिरीष श्रॉफ (४५), मयूरी पठाडे (१३), द्वारकाबाई ढगे (६५), सुभद्रा साळवे (५०), संजय जाधव (४०), अनीसुद्दीन शेख (३५), लतेश मगरे (२५), उषाताई कुलकर्णी (८०), अनुसयाबाई साळुंके (७०), नारायण गोरे (५५), वासंती गत्रे (८०), इरफान खान (२९), श्वेता जी. (१६), मयूर डोंगरे (२६), योगेश मोरे (१७), फाजल सय्यद (३१), दौलतराव जिरे (६२), मंगल दहीहंडे (३४), अक्षय हटकर (१८), अशोक हाके (४०), सुरेश राठोड (२८), फरीदा शेख (२६), गणेश मारुते (५८), चंद्रकला राठोड (४५), सुंदरबाई मोरे (६५), योगिता वैष्णव (२५), दिनकर सोनवणे (५२), गोरखनाथ अंगद (१४), रामकिसन सांगळे (७१), रमेश कुलकर्णी आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com