डॉ. लघाने यांना जिवंत जाळणाऱ्या चौघांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हरिश्‍चंद्र लघाने यांचे बंधू डॉ. विठ्ठल लघाने यांना जिवंत जाळणाऱ्या चौघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शेतीच्या वादातून लोहगाव (ता. पैठण) शिवारात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पौर्णिमा कर्णिक यांनी गुरुवारी (ता. सहा) ही शिक्षा सुनावली. 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हरिश्‍चंद्र लघाने यांचे बंधू डॉ. विठ्ठल लघाने यांना जिवंत जाळणाऱ्या चौघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शेतीच्या वादातून लोहगाव (ता. पैठण) शिवारात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पौर्णिमा कर्णिक यांनी गुरुवारी (ता. सहा) ही शिक्षा सुनावली. 

मृत डॉ. लघाने यांचे भाऊ नानासाहेब भाऊराव लघाने (रा. रांजणगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार मौजे खाम जळगाव येथील गट क्र. ५४ मधील तीन हेक्‍टर अठरा आर जमीन नानासाहेब लघाने यांनी आरोपी हरिभाऊ अण्णासाहेब लाटे (रा. खामजळगाव, ता. पैठण) याच्याकडून विकत घेतली होती; मात्र जमिनीचे भाव वाढल्याचे पाहून लाटे याने हरिभाऊ यांना चार एकर जमीन परत विकत मागितली. त्यामुळे एकूण जमिनीपैकी एक हेक्‍टर ५९ आर जमीन हरिभाऊला विकली होती. मात्र विकत घेतलेली जमीन त्याने दोघांना विकून टाकली होती. दरम्यानच्या काळात पैशांची गरज असल्याने लघाने यांनी उर्वरित जमीन आनंदा मुरलीधर निकम यांना विकली. मात्र जमीन परत देण्यासाठी हरिभाऊ हा निकम यांना धमकावत होता. अखेर कंटाळून निकम यांनी ती जमीन अशोक चव्हाण यांना विकली. अशोक चव्हाण यांना शेती करणे शक्‍य नसल्याने त्यांनी डॉ. विठ्ठल लघाने यांना मुख्त्यारनामा करून दिला. त्यानंतर डॉ. लघाने यांनी शेतीच्या कामासाठी सुभाष निकम याला कामावर ठेवले होते; मात्र आरोपी हरिभाऊ हा जमिनीसाठी त्रास देत होता, त्याने शेतमजूर सुभाष याला मारहाण केली, या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

पोलिसांनी हरिभाऊला अटक केली. याचा राग आरोपी हरिभाऊच्या मनात होता. दरम्यान १७ ऑक्‍टोबर २०१२ रोजी डॉ. विठ्ठल लघाने हे दामू भवर, फकिरचंद गाडेकर यांच्यासह कारने शेताकडे निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून जीपने आलेल्या आरोपी हरिभाऊ, भावड्या ऊर्फ भाऊसाहेब गोरख पवार (रा. लामगव्हाण, ता. पैठण), बद्री काशिनाथ शिंदे (रा. अमरापूर वाघुंडी, ता. पैठण), नारायण सर्जेराव डोळस (रा. अमरापूर वाघुंडी, ता. पैठण) यांनी डॉ. लघाने यांच्या कारला धडक दिली. कार थांबताच चौघांनी डॉ. लघाने यांच्यासह तिघांवर हल्ला चढविला. आरोपींनी डॉ. लघाने यांच्या डोक्‍यात टॉमीने जोराचा वार केला. यात डॉ. लघाने हे जागीच कोसळले व बेशुद्ध झाले. त्यानंतर जीपमधून डिझेलची कॅन काढून डॉ. लघाने यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून दिले. यात डॉ. लघाने यांचा जळून मृत्यू झाला. 

या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप जाधव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील शिवाजी नवले यांनी बारा जणांच्या साक्षी नोंदविल्या. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फकिरचंद गाडेकर, दामू भवर, मेराज पठाण, तसेच डॉक्‍टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने चारही आरोपींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, तर भावड्या, बद्री व नारायण यांना कलम ३२३ अन्वये दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

Web Title: aurangabad news dr. laghane case Life imprisonment