पाडापाडीला विरोध कराल, तर... अपात्रतेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात सुरू असलेल्या धार्मिक स्थळांच्या पाडापाडीला विरोध करणाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी शनिवारी (ता.पाच) दिला. कारवाईदरम्यानची व्हिडिओ शूटिंग तपासून, पथक प्रमुखांचे अहवाल मागविण्यात येतील, त्यानंतर नगरसेवकांवर अपात्रतेसारखी, तर इतरांवर सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात येईल, हा अहवाल न्यायालयातही सादर करण्यात येणार असल्याचे श्री. मुगळीकर यांनी स्पष्ट केले.

शहरातील धार्मिक स्थळांच्या पाडापाडीची मोहीम न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. प्रशासनाला न्यायालयाचे आदेश जसे बंधनकारक आहेत, तसेच नागरिकांनीही याचा मान राखून कारवाईला सहकार्य केले पाहिजे. बहुतांश ठिकाणी सहकार्य मिळत असल्याचे श्री. मुगळीकर म्हणाले. काही ठिकाणी मात्र विरोध होत आहे, त्यात नगरसेवकही विरोध करण्यासाठी समोर येत आहेत. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कारवाई सुरू असताना महापालिकेतर्फे व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. त्याची तपासणी करण्यात येईल, तसेच पथक प्रमुखांचे अहवाल घेऊ, त्यानंतर नगरसेवकांना नोटिसा देण्यात येतील. अपात्रतेसारख्या कारवाईचा त्यात समावेश असू शकतो. इतरांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारी ठाण्यात देण्यात येतील, असा इशारा आयुक्तांनी दिला. 

आतापर्यंत ४६ ठिकाणी कारवाई 
पाडापाडीची कारवाई गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत ४६ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, सध्या केवळ ‘ब’ गटातील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यात ४९६ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यातील ३४२ धार्मिक स्थळे सिडकोच्या खुल्या जागेवर आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे ती ‘ब’ गटात आली असल्याचे आयुक्त म्हणाले.

‘जबलपूर पॅटर्न’ राबविण्याची गरज
विकास आराखड्यातील रस्त्यांच्या आड येणाऱ्या धार्मिक स्थळांचा वेगळा विषय आहे. ही कारवाई करताना भूसंपादनासाठी निधीची कमतरता पडू शकते. किंवा रस्त्याआड येणाऱ्या धार्मिक स्थळांची केवळ अनधिकृत बांधकामे म्हणून पाडापाडी करता येऊ शकते. रस्ते मोकळे करायचे असतील तर ‘जबलपूर पॅटर्न’प्रमाणे कारवाई करावी लागेल. तेथील आयुक्तांनी रस्ते मोकळे झाल्यास शहराचा कसा विकास होऊ शकतो हे मालमत्ताधारकांना पटवून दिले. त्यानंतर नागरिकांचे मोठे सहकार्य मिळाल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: aurangabad news encroachment