दर्गा हटविण्यावरून पैठण गेटवर तणाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - दर्गा हटविण्यास विरोध करीत शेकडो नागरिक जमल्याने पैठण गेटवर शनिवारी (ता. पाच) तीन तास तणाव निर्माण झाला. महापालिका, पोलिसांच्या पथकाने याच ठिकाणी ठिय्या मांडल्यामुळे नागरिकांनी नमते घेत आम्ही स्वतः दर्गा काढून घेऊ, एक दिवसाचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दुसऱ्यांदा नागरिकांना वेळ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा तणाव निवळला. चार वाजता पोलिसांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैठण गेट सोडले. 

पैठण गेटमध्ये असलेली दर्गा हटविण्यासाठी उपायुक्त रवींद्र निकम यांचे पथक पोलिस बंदोबस्तासह दुपारी एक वाजताच्या सुमारास पोचले. महापालिकेचे पथक दिसताच शेकडो नागरिक जमले. काहींनी जागेची कागदपत्रे असल्याचा दावा केला; तर काहींनी दर्ग्यात विधी सुरू केला. यावेळी माजी नगरसेवक अशफाक सलामी, नासेर कुरेशी, नगरसेविका रेशमा कुरेशी यांचे पती अशफाक कुरेशी यांच्यासह नागरिकांशी तासभर चर्चा झाल्यानंतर महापालिका अधिकारी व पोलिसांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्गा काढून घेण्यासाठी वेळ दिला. मात्र, दर्गा हटविल्याशिवाय आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेत पोलिसांसह महापालिकेचे अधिकारी पैठण गेट येथील पोलिस चौकीत ठाण मांडून बसले. विधी आटोपल्यानंतर काही जणांनी दर्ग्याची संरक्षण भिंत पाडण्यास सुरवातही केली. संरक्षण भिंतीची पाडापाडी सुरू असताना नगरसेवक अफसर खान व सय्यद मतीन या ठिकाणी आले. त्यांनी आमचे धर्मगुरू येणार असून, ते आल्यानंतर स्वतः होऊन दर्गा काढून घेऊ, आयुक्तांनी त्यानुसार वेळ दिला आहे. त्यामुळे तुम्ही येथून निघून जा, अशी विनंती उपायुक्त निकम यांच्याकडे केली. मात्र, जोपर्यंत आयुक्त मला आदेश देत नाहीत तोपर्यंत मी येथून जाणार नाही, असे निकम यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत अफसर खान यांना तेथून जाण्याच्या सूचना केल्या. त्यांनी नंतर आयुक्तांची भेट घेऊन निकम यांच्याशी बोलणे करून दिले. त्याची कल्पना निकम यांनी पोलिसांना देताच दुपारी चार वाजता पोलिसांसह पथकाने पैठण गेट सोडले. यापूर्वीसुद्धा हा दर्गा हटविण्यावरून तणाव निर्माण झाल्याने महापालिकेने दोन दिवसांचा वेळ दिला होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या कारवाईला नागरिक सहकार्य करत आहेत. त्यामुळे अद्याप कुठेही गालबोट लागलेले नाही. पैठण गेट येथे धर्मगुरू येणार असल्याने वेळ मिळावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार वेळ देण्यात आला आहे. वेळ दिला म्हणजे महापालिकेने माघार घेतलेली नाही. 
- डी. एम. मुगळीकर, आयुक्त, महापालिका

Web Title: aurangabad news encroachment paithan