फेसबुकवरून ओळख, प्रेम अन्‌ पलायन!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर लगट करीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर बुलडाण्यावरून औरंगाबादेत मुलीशी सतत भेटण्यासाठी येत तरुणाने तिला पळवून नेल्याचा प्रकार घडला. पोलिस मागावर असल्याने तो चक्क बारा सिमकार्ड वापरत होता; परंतु एक कॉल आईला केला अन्‌ लोकेशनवरून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

औरंगाबाद - फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर लगट करीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर बुलडाण्यावरून औरंगाबादेत मुलीशी सतत भेटण्यासाठी येत तरुणाने तिला पळवून नेल्याचा प्रकार घडला. पोलिस मागावर असल्याने तो चक्क बारा सिमकार्ड वापरत होता; परंतु एक कॉल आईला केला अन्‌ लोकेशनवरून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

सत्यपाल भीमराव वाकोडे (वय : २५, रा. चिखली, बुलडाणा) असे संशयित तरुणाचे नाव आहे. शहरातील सतरा वर्षे दहा महिने वय असलेल्या मुलीशी त्याची फेसबुकवरून ओळख झाली. चॅटिंग व गप्पाटप्पांतून त्याने तिच्याशी लगट लावली. ओळखीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. यानंतर तो औरंगाबादेत तिला भेटण्यासाठी आला. लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. सतत औरंगाबादला येऊन भेटणे सुरूच होते; पण वारंवार भेटण्यापेक्षा लग्न करण्याचा इरादा त्याने तिला सांगत भुरळ पाडली. लग्नाच्या आमिषाला बळी पाडून त्याने मुलीचे अपहरण केले. पुणे, बुलडाणा येथे राहून ते सुरत येथे एका नातेवाइकाकडे थांबले. दुसरीकडे मुलीचे अपहरण झाल्याची शक्‍यता पाहून पालकांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दिली. यात गुन्हा नोंद झाला. 

दरम्यान, या प्रकरणात सायबरसेलने तपास सुरू केला. दोघे सुरत येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांना चार दिवसांपूर्वी अमरोली (सुरत) येथून ताब्यात घेतले व मुलीची सुटका केली. ही कारवाई उपनिरीक्षक अनिल वाघ, हेमंत तोडकर व पथकाने केली. सत्यपाल वाकोडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे. 

तब्बल आठ गुन्हे..!
सत्यपाल चिखली, बुलडाणा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर तेथील पोलिस ठाण्यात दंगल, मारहाण प्रकरणात आठ गुन्हे नोंद आहेत. तंत्रकुशल असलेला सत्यपाल हा गुन्हा घडल्यानंतर तब्बल बारा सिमकार्ड वापरत होता; परंतु एक कॉल आईला केल्याने सायबरसेलला त्याचा शोध घेणे सोपे झाले.

Web Title: aurangabad news facebook social media

टॅग्स