पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील पिके नष्ट झाली असून शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही स्पष्ट केले.

औरंगाबाद - अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील पिके नष्ट झाली असून शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही स्पष्ट केले.

विभागीय आयुक्‍त कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (ता. १५) पालकमंत्री कदम यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना श्री. कदम म्हणाले, की मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असून शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाने निर्मिती केलेल्या जिल्हा विकास पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. पोलिस विभागात विशेष कामगिरी करणारे, राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस अधिकारी, ग्रामपंचायती, गुणवंत विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात पोलिस आयुक्‍त कार्यालयातील सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे यांना उत्कृष्ट गुन्हे तपासाबाबत, तर उपायुक्‍त राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे गुप्त वार्ताअधिकारी रघुनाथ फुके यांचा उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. तसेच सिटी चौक पोलिस ठाण्यातील निरीक्षक राजेंद्र चंद्रया कुत्तुल यांना विशेष सेवापदक देऊन गौरविण्यात आले. 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१६-१७ विभागीय स्पर्धेत धामणगाव (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) ग्रामपंचायतीस दहा लाख रुपयांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपुरस्कार, शेळगाव गौरी (ता. नायगाव, ता. नांदेड) ग्रामपंचायतीस द्वितीय आठ लाख रुपये, तर पिंपराळा (ता. वसमतनगर, जि. हिंगोली) ग्रामपंचायतीस सहा लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार, खासगाव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) ग्रामपंचायतीस वसंतराव नाईक पुरस्कार, कुटुंब कल्याणसाठीचा आबासाहेब खेडकर पुरस्कार पोखरी (ता. जि. औरंगाबाद) ग्रामपंचायतीस, अलियाबाद (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील ग्रामपंचायतीस डॉ. आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले.  

या वेळी स्वातंत्र्यसैनिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील व अतुल सावे, माजी आमदार एम. एम. शेख, महापौर भगवान घडामोडे, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह उपस्थित होते.

Web Title: aurangabad news farmer ramdas kadam