औरंगाबादेत संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आठवडी बाजार 

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 2 जून 2017

जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत संपात सहभागी व्हा, अन्यथा, काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास व्यापारीच जबाबदार राहतील

औरंगाबाद - शेतमालास हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता धार चढत आहे. आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकलठाणा येथील आठवडा बाजार संभाजी ब्रिगेडने बंद पाडला. संपामुळे बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी बाजारात येत असतानाच घोषणाबाजी करीत थाटण्यात येणारी दुकाने गुंडाळायला लावली. यावेळी व्यापारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादीही झाली. 

शेतकरी संपाला गुरुवारपासून सुरवात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच शहरातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या जाधववाडी येथे शेतकरी नेते आणि व्यापारी यांच्यात वाद झाले. त्याचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाले. संपाचा पहिल्याच दिवशी ग्राहकांना फटका सहन करावा लागला. पालेभाज्यांचे भाव व्यापाऱ्यांनी गगनाला भिडवले. दुसऱ्या दिवशी शहरातील छोट्या छोट्या बाजारातही अत्यल्प माल दाखल झाला. शेतकऱ्याचा संप सुरु असताना व्यापाऱ्यांनी देखील त्यात सहभागी व्हावे, अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुकूंदवाडी येथे दररोजचा भरणारा बाजार बंद पाडला. त्यानंतर चिकलठाणा येथील मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या आठवडी बाजारात कार्यकर्ते दाखल झाले. तेथे दुकाने थाटण्याचे काम सुरु असतानाच तातडीने बंद करायला भाग पाडले.

जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत संपात सहभागी व्हा, अन्यथा, काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास व्यापारीच जबाबदार राहतील, असा इशाराही जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राम भगुरे, बाबासाहेब दाभाडे, सरपंच अनिल हिरडे पाटील, शिवक्रांती संघटनेचे सुनील कोटकर, शिवाजी जगताप यांनी दिला. यावेळी संजय सोमवंशी, डॉ. बन्सी डोणगावकर, विष्णु बैनाडे, रविंद्र बोचरे, अक्षय मेलगर, राजेंद्र पाटील, वैभव बोडखे, पवन खडके, सचिन मगर, आकाश पाटील, ज्ञानेश्‍वर अंभोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: aurangabad news: farmer strike sambhaji brigade