शेतकऱ्यांचा संप आमच्यासाठी वेदनादायी : पंकजा मुंडे

अतुल पाटील
गुरुवार, 1 जून 2017

शेतकऱ्यांसाठी आणखी योजना राबवाव्या लागणार 

पंकजाताई तत्वाला धरुन चालणाऱ्या आहेत. त्यामुळे अनेकांचा रोष आहे. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी संवाद यात्रा महत्वाची आहे.

औरंगाबाद : शेतकरी संपावर जाणे, सरकार म्हणून हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. आणखी चांगल्या योजना वाढवाव्या लागणार आहेत. शेतकरी हा समाजाचा कणा आहे, त्यांना आधार दिला पाहिजे. अशीच आमची भुमिका असल्याचे ग्रामविकास, महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

जलयुक्‍त शिवारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आणि तक्रारीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, वर्षभरापूर्वी त्या खात्याची मंत्री असताना एका तक्रारीवरुन जलयुक्‍त शिवारच्या चौकशीचे आदेश मी स्वत:च दिले होते. त्यात काही तथ्या आढळले नाही. (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील ग्रामविकास हा जलयुक्‍त शिवार योजनेच्या माध्यमातून सुरु आहे. जलयुक्‍त शिवार ही मुंडे साहेबांचीच देण आहे. त्यांच्याच विचारातून ही कल्पना आली होती. असेही त्यांनी सांगितले. 

राज्य, केंद्र सरकार शेतकरी केंद्रित विकास करत आहे. योजना सफल होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. पंकजाताई तत्वाला धरुन चालणाऱ्या आहेत. त्यामुळे अनेकांचा रोष आहे. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी संवाद यात्रा महत्वाची आहे. याआधी खतासाठी राज्यात गोळीबारही झाला आहे. त्याप्रमाणात आजची स्थिती चांगली आहे. असा चिमटा पंकजा मुंडे यांनी विरोधकांना काढला. 

जलयुक्‍त शिवार योजनेमुळे जमिनीतील पाणी वाढले आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मराठवाड्यात मिटला आहे. तरीही देशाच्या आणि जागतिक बाजारपेठेचा परिणाम शेतीवर होतो. शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला मध्यस्थी ठेवण्याची सवय लागली आहे. ती साखळी तोडण्याचे काम आमचे सरकार करत आहे. कर्जमाफी करुनही शेतकरी आत्महत्या थांबवेल, याची शाश्‍वती नसल्याने कायमस्वरुपी उपाय राबवण्यावर सरकारच भर आहे. शेतकरी स्वावलंबी बनवणे हेच ध्येय आहे. 

नरेंद्र मोदी नुसत्या घोषणाच करतात, असे लोक बोलतात. तसे माझ्याही बाबतीत होऊ शकते. आधीचे सरकार तर घोषणाही करत नव्हते. पंचवार्षिकमधील पहिले दोन वर्ष घोषणांचेच असते. पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भाप्रमाणे हेलिकॉप्टरमधून फिरताना शेततळ्यामुळे मराठवाड्यातही दिसत असल्याचे समाधान पंकजा मुंडे यांनी व्यक्‍त केले.

Web Title: aurangabad news farmers strike pankaja munde bjp