अनुदान लाटले, बाराशे जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता वर्षभरापूर्वी घेऊनही बांधकाम न करणाऱ्या शहरातील बाराशे जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. शहर पांदणमुक्त करण्यासाठी दहा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद - स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता वर्षभरापूर्वी घेऊनही बांधकाम न करणाऱ्या शहरातील बाराशे जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. शहर पांदणमुक्त करण्यासाठी दहा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

केंद्र व सरकारने देशभरातील शहरे पांदणमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ज्यांच्याकडे स्वच्छतागृह नाही त्यांना बांधकामासाठी 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात सर्वेक्षण केले. त्यानंतर शहरात सात हजार 900 वैयक्‍तिक स्वच्छतागृह बांधण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले. त्यानुसार पालिकेने लाभार्थींची निवड करून त्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची म्हणजे प्रत्येकी सहा हजार रुपयांची रक्कम जमा केली; परंतु अनेकांनी वर्षे उलटले तरी अद्याप स्वच्छतागृहाची वीटदेखील रचलेली नाही. आतापर्यंत शहरात केवळ सहा हजार लोकांची स्वच्छतागृहाचे बांधकाम केले आहे. उर्वरित बाराशे जणांना वारंवार तंबी देऊनदेखील बांधकाम केलेले नाही. महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृह बांधून घेण्यासाठी पाठपुरावाही केला. तरीही परिणाम होत नसल्याने वॉर्ड अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. त्याची दखल घेत आता प्रशासनाने या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्‍तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश वॉर्ड कार्यालयांना देण्यात आले आहेत, असे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. याआधीही शहरात नऊ जणांविरुद्ध अशाचप्रकारे गुन्हे दाखल केलेले आहेत. 

सार्वजनिक स्वच्छतागृहांना प्राधान्य 
उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी अद्याप अनेक भागांतील नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने या भागात किमान दहा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याचे श्री. भालसिंग यांनी सांगितले. 

कॅन्सर हॉस्पिटलला दिले पत्र 
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मराठवाड्यासह इतर ठिकाणांहून रुग्ण येतात; मात्र त्यांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलने काहीच व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हे नातेवाईक उघड्यावर शौचास जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हॉस्पिटलने तातडीने स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी असे पत्र देण्यात आले असल्याचे श्री. भालसिंग यांनी सांगितले. 

केंद्रीय पथक येण्यापूर्वी शहर पादंणमुक्त 
शहरातील स्वच्छतागृहांची राज्य शासनाच्या पथकाकडून नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. या पथकाने तातडीने अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत. केंद्रीय पथकदेखील पाहणीसाठी येणार असून, त्यापूर्वी महापालिकेला शहर पादंणमुक्त करावे लागणार आहे.

Web Title: aurangabad news fund