गुपचूप कचरा टाकणे महापालिकेला भोवले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - एमआयडीसीच्या हद्दीतील खुल्या जागेत गुपचूप कचरा टाकणे महापालिकेला सोमवारी (ता. १२) चांगलेच महागात पडले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत हा कचरा टाकल्याचे उघड होताच उद्योजक आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी वसाहतीतच ट्रक, जेसीबी रोखून धरला. 

औरंगाबाद - एमआयडीसीच्या हद्दीतील खुल्या जागेत गुपचूप कचरा टाकणे महापालिकेला सोमवारी (ता. १२) चांगलेच महागात पडले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत हा कचरा टाकल्याचे उघड होताच उद्योजक आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी वसाहतीतच ट्रक, जेसीबी रोखून धरला. 

कचरा टाकण्यासाठी जागा शोधत फिरणाऱ्या महापालिकेने सोमवारी सकाळी एमआयडीसीच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत कचरा गुपचूप आणून टाकला. एका मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यात कचरा टाकण्याचे कामही एमआयडीसीला अंधारात ठेवून सुरू होते. ग्रीव्हज कॉटनच्या समोर आणि गरवारेच्या मागील बाजूस असलेल्या या खुल्या जागेत हा टाकलेला कचरा पाहिल्यावर उद्योजकांनी एकजूट दाखवत विरोध केला. विरोध होत असल्याचे पाहून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी सोहम वायाळ आणि कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांना फोन करून कचरा टाकू देण्याची विनंती केली. त्याला एमआयडीसीने विरोध दर्शवला आणि थेट चिकलठाणा औद्योगिक वसाहत गाठली. ट्रक आणि जेसीबी थांबवून घेत टाकलेला सगळा कचरा उचलण्याची मागणी मासिआचे उपाध्यक्ष किशोर राठी, भगवान राऊत, राजेंद्र चौधरी, मनीष गुप्ता, अभय हंचनाळ, कुंदन रेड्डी आदींनी केली. 

अधिकारी दाद देईनात, बेदरकर अडकले
कचरा टाकण्याचे आदेश मिळाल्यावर ट्रक घेऊन आलेले स्वच्छता निरीक्षक बेदरकर यांनी कचरा टाकला खरा पण त्यांनाच मनस्ताप सहन करावा लागला. उद्योजकांनी कचरा उचला असा पवित्रा घेतल्याने बेदरकर अडकले. फोनाफोनी करून त्यांनी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना मदत मागितली. परंतु ज्यांनी फोन उचलले त्यांनी टोलवाटोलवी केली तर काहींनी फोनलाच प्रतिसाद दिला नाही. 

उद्योजकांनी मेकॅनिकल  सेक्‍शनला आणला कचरा 
संपूर्ण कचरा उचलण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या उद्योजकांचा रोष पाहून महापालिकेचे घटनास्थळावर असलेले निरीक्षक बेदरकर यांना घेऊन कचऱ्याच्या गाडीसह सायंकाळी साडेसहाला काही उद्योजक मेकॅनिकल सेक्‍शनला गेले होते. ही गाडी रिकामी करून ती माघारी आणून हा कचरा परत भरण्याचा प्रयत्न सोमवारी (ता. १२) रात्री सुरू होता. या ठिकाणी सायंकाळी मासिआ अध्यक्ष सुनील किर्दक आणि अन्य उद्योजकही आले होते. आपली ड्युटी संपल्याचे सांगत ट्रक ड्रायव्हरनेही तेथुन काढता पाय घेतला.

लेखी आश्‍वासन
कचरा काढून घेण्यासाठी ट्रक न मिळाल्यावर मासिआचे सदस्य आणि अन्य उद्योजकांनी कर्मचारी बेदरकर यांच्यासह चिकलठाणा पोलिस ठाणे गाठत आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावर पोलिसांनी या प्रकरणात सामंजस्याची भूमिका बजावत हा कचरा मंगळवारपर्यंत (ता. १३) पूर्ण उचलण्याचे लेखी आश्वासन देण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यास सांगितले. हे लेखी आश्वासन मिळाल्यावर प्रकरण काही काळासाठी शांत झाले असल्याची माहिती सुनील किर्दक यांनी ‘सकाळ’ला दिली.

Web Title: aurangabad news garbage amc