शहरात अजूनही साडेसहा हजार टन कचरा पडून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद - कचराकोंडीमुळे सुमारे साडेसहा हजार टनापेक्षा अधिक कचरा साचला आहे. महापालिका प्रशासन फक्‍त हा कचरा उपसण्याचे काम करत आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्याबाबत अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. साचलेल्या कचऱ्याची महापालिका प्रशासन लपूनछपून विल्हेवाट लावत आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या बाजूला कचरा टाकण्यासाठी खड्डा करण्यात आला असून तेथे कचरा टाकण्यात येणार असल्याचे दिसून आले. 

रविवारी (ता. 18) सार्वजनिक सुटीचा दिवस असूनही जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त कचऱ्याबाबत बैठक घेणार असल्याचे समोर आले होते. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली नसून प्रशासनाला कचऱ्याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे समोर आले. दोन दिवसांत महापालिका प्रशासनाकडून रात्री-अपरात्री कचरा दुसरीकडे नेऊन टाकण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेकडून मिळेल त्या जागेवर कचरा संपविण्यात येत आहे. 

वाळूजला शुक्रवारी रात्री 25 टनाहून जास्त कचरा जिरविण्यात आला. मात्र, शेतकऱ्याला फसवून मिश्र कचरा टाकण्यात आल्याने त्याने विरोध केला असल्याने आता उर्वरित कचऱ्याने भरलेली वाहने शहरातच थांबलेली आहेत. शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत असून याबाबत प्रशासनाने कोणताच विचार केला नाही. त्यामुळे साचून राहिलेल्या कचऱ्याला पेटवून देण्याचे काम स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रदूषणामुळे दुष्परिणाम होणार असल्याचे माहीत असूनही महापालिका प्रशासन कचरा उचलत नसल्याने याचे नागरिकांना दुष्परिणाम सहन करावे लागत आहेत. 

Web Title: aurangabad news garbage amc