पडेगावातही कचराबंदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

औरंगाबाद - पडेगावात कचऱ्याला विरोध सुरूच आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १८) कचऱ्याने भरलेले ट्रक भावसिंगपुरा, पडेगावातील नागरिकांनी अडवून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. पूर्वी टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्याशिवाय येथे नवा कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी नमते घेत यापुढे इथे कचरा घेऊन येणार नाही, सध्या आणलेले ट्रक रिकामे करू द्या, असे आवाहन केले. त्यानंतर नागरिकांनी पंधरा गाड्या कचरा रिकामा करू देत माघार घेतली. 

शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याने व त्यात पाऊस सुरू झाल्याने महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चिकलठाणा व पडेगाव येथील जागेवर कचरा टाकला जात आहे. मात्र, यापूर्वी टाकलेल्या कचऱ्यावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांकडून विरोध होत आहे. महापालिकेने मंगळवारी (ता.१७) पडेगाव येथील कत्तलखाना परिसरात कचऱ्याच्या पन्नास गाड्या रिकाम्या केल्या. या वेळी काही नागरिकांनी कचऱ्याच्या गाड्यांवर दगडफेक केली. त्यात एका ट्रकच्या काचा फुटल्या. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला. बुधवारी सकाळी पुन्हा वाहने पोलिस बंदोबस्तात पडेगाव भागात पोचली. 

मात्र नागरिक या ट्रकला आडवे गेले. रस्त्यावरच ठिय्या देत ही वाहने पुढे जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला. शहर अभियंता सखाराम पानझडे, सहायक आयुक्‍त नंदकुमार भोंबे यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी कचऱ्याला कडाडून विरोध केला. अधिकाऱ्यांनी यापुढे कचरा आणणार नाही, सध्या आणलेले ट्रक रिकामे करू द्या, असे आवाहन केले. त्यानंतर आंदोलकांनी नमते घेतले. आंदोलनात खंडेराव लोखंडे, बाळासाहेब शेलार, सुनील लोखंडे, अंकुश लोखंडे, दिलीप कवडे यांच्यासह भावसिंगपुरा, पडेगाव आणि ग्लोरिया सिटी येथील नागरिकांचा मोठा सहभाग होता.

Web Title: aurangabad news Garbage ban in Padgaon