आता नाल्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा   

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नाल्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावून संबंधित नागरिकांवर दंड व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिला. याबाबत लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी (ता. ३१) त्यांनी सांगितले. 

औरंगाबाद - नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नाल्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावून संबंधित नागरिकांवर दंड व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिला. याबाबत लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी (ता. ३१) त्यांनी सांगितले. 

पत्रकारांसोबत बोलताना श्री. मुगळीकर म्हणाले, ‘‘शहरातील अनेक नाल्यांमध्ये नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबण्यासोबतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफसफाई करण्यासाठी अडचणी येतात. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नाल्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून कचरा टाकणाऱ्यांना दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. लवकरच अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.’’ 

लवकरच चीन दौरा 
शहरात निघणारा व मांडकी (नारेगाव) येथील डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक कंपन्या समोर आल्या असून, सोमवारी स्पेन येथील कंपनीने सादरीकरण केले. स्वखर्चातून १२० कोटी रुपयांचा प्रकल्प टाकण्यासाठी कंपनी तयार आहे. यापूर्वी इंग्लंड येथील कंपनीने प्रस्ताव दिला होता. ही कंपनीदेखील येणार आहे; तसेच लवकरच महापालिका अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चीन येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. 

रात्री उचलणार कचरा 
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्री कचरा उचलण्याचे लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे श्री. मुगळीकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत 
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दोन कोटी रुपये खर्च करून शहर कचरामुक्त करता येऊ शकते; मात्र माझी ही संकल्पना काही जणांना आवडणार नाही, असे सोमवारी (ता. ३०) सांगितले होते. त्यावर श्री. मुगळीकर म्हणाले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे आम्ही स्वागत करतो. शहर कचरामुक्त करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सल्ल्याच्या अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल.’’

Web Title: aurangabad news garbage crime