सहलीहून परतताच कचरा पर्यटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी ३९ व्या दिवशीही कायम असून, सहलीहून परतलेल्या पदाधिकाऱ्यांसह प्रभारी आयुक्तांनी सोमवारी (ता. २६) विविध भागांत पाहणी केली. या वेळी काही वसाहतींमध्ये कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे आढळून आले; तर जागोजागी कचरा धुमसत असल्याचे चित्र कायम होते. त्याची कबुलीही पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी दिली. 

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी ३९ व्या दिवशीही कायम असून, सहलीहून परतलेल्या पदाधिकाऱ्यांसह प्रभारी आयुक्तांनी सोमवारी (ता. २६) विविध भागांत पाहणी केली. या वेळी काही वसाहतींमध्ये कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे आढळून आले; तर जागोजागी कचरा धुमसत असल्याचे चित्र कायम होते. त्याची कबुलीही पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी दिली. 

सहलीवर गेलेले महापालिका पदाधिकारी रविवारी शहरात परत आले. त्यांनी सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांसोबत मध्यवर्ती बसस्थानक, आकाशवाणी, गजानन महाराज मंदिर रोड, पुंडलिकनगर रोड आदी भागांत पाहणी केली. आकाशवाणीजवळ साचलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे, शहागंज बसस्थानकातील कचऱ्यावर केमिकल फवारणी करावी, ओल्या कचऱ्यावर औषधींची फवारणी करून त्यापासून खत निर्मिती करावी अशा सूचना पाहणीत करण्यात आल्या. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, विरोधी पक्षनेता फेरोज खान, प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके आदींची उपस्थिती होती.  

रात्री कचरा उचलण्याच्या सूचना 
पुंडलिकनगर भागात रात्रीही कचरा गोळा करण्याची सूचना आयुक्तांनी केली. शहरातील मोजक्‍याच वसाहतींमध्ये आता कचऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, त्या भागात कचरा साचून आहे, असे प्रभारी आयुक्तांनी सांगितले. 

कचरा कमी झाल्याचा दावा 
शहरात कचरा कमी झाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये परिस्थितीत आणखी सुधारणा होईल. नागरिकांनी कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण दिल्यास हा प्रश्न अजिबात दिसणार नाही, असेही प्रभारी आयुक्तांनी नमूद केले.  

प्रभारी आयुक्तांचे मसुरी प्रशिक्षण
मसुरी येथे सात एप्रिलपासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी आपली निवड झाल्याचे प्रभारी आयुक्त  नवल किशोर राम यांनी सांगितले. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन करावे, अशी विनंती शासनाकडे करण्यात आल्याचे श्री. राम म्हणाले. 

वॉर्ड कार्यालये उशिरापर्यंत 
मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेचे सर्व नऊ वॉर्ड कार्यालये रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दोन तास अधिक काम करण्याची सूचना देण्यात आली असून, रात्री आपापल्या प्रभागात त्यांनी पाहणी करावी, रस्त्यांवर, दुभाजकांवर कोणी कचरा टाकणार नाही, यासाठी पेट्रोलिंग करावी, अशी ताकीद देण्यात आल्याचे प्रभारी आयुक्तांनी सांगितले.

दोषी अधिकाऱ्यास पुन्हा पदभार 
प्रभारी आयुक्तांनी सायंकाळी काही अधिकाऱ्यांचे पदभार बदलले. त्यात लाड समितीअंतर्गत महापालिकेत करण्यात आलेल्या नियुक्‍त्यांमध्ये हे उपायुक्त दोषी आढळले होते. शासनाने चौकशीसाठी नियुक्त केलेल्या तुकाराम मुंढे यांच्या समितीने त्यांना दोषी ठरविले होते.

Web Title: aurangabad news garbage issue