कचऱ्यातून होणार दहा दिवसांत सुटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

औरंगाबाद - महिनाभरापासून कचऱ्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आशेचा किरण दाखविला आहे. येत्या दहा दिवसांत कचऱ्याचा प्रश्‍न सुटलेला असेल, अशी ग्वाही त्यांनी सोमवारी (ता. 19) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना दिली. अद्याप दीड हजार मेट्रिक टन कचरा जागोजागी पडून असून, मंगळवारपासून (ता. 20) या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची दुर्गंधीमधून सुटका होईल, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 102 जागा उपलब्ध असून, संभाव्य विरोध लक्षात घेता नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

शहरातील कचराकोंडी महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही सुटलेली नाही. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरवातीला कचऱ्याचा विषय महापौरांनी उपस्थित केला. त्यानंतर गंगाधर ढगे यांनी प्रभाग एक व तीनमध्ये कचरा पडून असून, तो कधी उचलणार, असा प्रश्‍न केला. रावसाहेब आमले यांनी मिटमिट्यातील जनतेवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला. या भागात कचरा टाकू नये, अशी आपण वारंवार विनंती केली; मात्र महापालिका अधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते व पुढील अनर्थ घडला, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज वानखेडे, कीर्ती शिंदे, आत्माराम पवार, जहॉंगीर खान, राजू शिंदे, प्रमोद राठोड, त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, भाऊसाहेब जगताप, संगीता वाघुले, सीताराम सुरे, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे, सीमा खरात, सभागृहनेते विकास जैन यांच्यासह नगरसेवकांनी सुमारे पावणेदोन तास कचऱ्यावर बाजू मांडली. त्यानंतर प्रभारी आयुक्तांनी येत्या दहा-बारा दिवसांत शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मिटलेला असेल, असे आश्‍वासन सभागृहात दिले. 

अशा आहेत उपाययोजना 
प्रभारी आयुक्त म्हणाले, की नारेगावात कचरा बंद झाल्यानंतर शहरात सुमारे दहा हजार मेट्रिक टन कचरा होता. सध्या दीड हजार मेट्रिक टन कचरा आहे, त्यातील एक हजार टन कचरा रस्त्यावर पडून आहे. मंगळवारपासून या कचऱ्यावर केमिकलची फवारणी करून जागेवरच त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. हे काम नाशिकच्या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामाचा अनुभव आहे. महापालिकेकडे सध्या 102 जागा असून, नागरिकांची संभाव्य विरोध पाहता जागा असलेल्या भागात बैठका घेऊन त्यांना खतनिर्मितीपासून कोणताही त्रास नसल्याचे पटवून देण्यात येईल. एक, दोन, तीन या प्रभागांमध्येदेखील सक्तीने कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येईल. योग्य नियोजन झाल्यास आठ ते दहा दिवसांत परिस्थिती नियंत्रणात येईल; अन्यथा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा देखील प्रभारी आयुक्‍तांनी दिला. 

नारेगावसाठी 50 कोटींचा खर्च 
शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा राज्य शासनाने 86 कोटींचा डीपीआर तयार केला असला तरी त्यात नारेगाव (मांडकी) येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामाचा समावेश नाही. न्यायालयाने या ठिकाणच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी वर्षभरात महापालिकेला 50 कोटींचा खर्च करावा लागणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 

काम सांगताच "सेवाभावी' गायब 
कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बसल्यानंतर अनेक सेवाभावी संस्था समोर आल्या होत्या. त्यातील अनेकांना कामे सुचविण्यात आली; मात्र कामे सांगताच या संस्था गायब होतात, असा अनुभव आल्याचे आयुक्त म्हणाले. 

कचरा वेचक आयात करणार 
शहरात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असून, त्याचे वर्गीकरण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लातूर, नांदेड येथील कचरा वेचकांना शहरात आणावे लागेल, असे प्रभारी आयुक्तांनी सांगितले.

Web Title: aurangabad news garbage marathwada