कचरा प्रकल्पासाठी दहा एकर जागा द्या!

कचरा प्रकल्पासाठी दहा एकर जागा द्या!

औरंगाबाद - शहरात रोज निघणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचा जागांचा शोध सुरूच असून, मंगळवारी (ता. २०) कृषी उत्पन्न बाजार समितीला दहा एकर जागेसाठी साकडे घालण्यात आले. महापालिकेकडे समितीचे अनेक विषय प्रलंबित असून, त्यावर तातडीने निर्णय घ्या, आम्ही जागा देण्याचा विचार करू, असे सभापती राधाकिशन पठाडे यांनी बैठकीत स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेने शहरात रोज निघणाऱ्या कचऱ्याचे ओला-सुका असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, तर सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नऊ प्रभागांसाठी जागेचा शोध सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहतूकनगरीसाठी महापालिकेला दहा एकर जागा जाहीर करण्यात आली होती. त्यापोटी २० लाख रुपये भरणा केलेला असताना समिती जागेचा ताबा देत नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे, तर ही जागा केवळ लीजवर देण्यात आलेली असून, वीस लाख रुपये भाड्यात संपले असे समितीचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांपासून या जागेसंदर्भात  वाद आहे. दरम्यान, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी या जागेचा वापर होऊ शकतो, म्हणून दहा एकर जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, माजी महापौर भगवान घडामोडे, सभापती राधाकिशन पठाडे, प्रभारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, समितीचे सचिव विजय शिरसाट यांची या वेळी उपस्थिती होती. महापालिका सध्या अडचणीत आहे. त्यामुळे जागेचा ताबा देण्यासाठी समितीने एक पाऊल पुढे करावे, असे आवाहन महापौरांनी बैठकीत केले. त्यावर श्री. पठाडे यांनी समितीचे अनेक विषय महापालिकेकडे प्रलंबित आहेत. वारंवार बैठका होऊन निर्णय झाले; मात्र अंमलबजावणी होत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. समितीला मालमत्ता कर, बेटरमेंट चार्जेस चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहेत. जिन्सी भागातील जागेला तारेचे कुंपण घालण्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर श्री. घोडेले यांनी या प्रश्‍नावर महापालिका अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, तुम्ही जागेचा ताबा द्या, अशी मागणी केली. तासभर चर्चा झाल्यानंतर पणन महासंघाच्या निर्णयाच्या अधीन राहून जागा ताब्यात देऊ; मात्र तत्पूर्वी संचालक मंडळाची बैठक घेऊन चर्चा करावी लागेल, असे पठाडे यांनी स्पष्ट केल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली. 

कोणतीही जागा ताब्यात घेऊ शकतो,जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे, सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या अधिकारात कुठलीही जागा ताब्यात घेऊ शकतो, अशी तंबी श्री. राम यांनी या वेळी दिली. 

महापौरांनी खडसावले... 
चर्चा सुरू असताना केवळ सहा महिने जागा देण्याची भूमिका सचिव शिरसाट यांनी घेतली. त्यावरून महापौर संतप्त झाले. कायदे आम्हालाही कळतात. त्याचा वापर करण्यासाठी अधिकारीदेखील आमच्याकडे आहेत, आम्ही मदत मागण्यासाठी आलो आहोत, नियम दाखवून अडचणी वाढवू नका, तुम्हाला जागाच द्यायची नसेल, तर आम्ही निघतो, असे म्हणत ते जागेवरून उठले; मात्र उपमहापौरांनी मध्यस्थी केल्यानंतर बैठक पुन्हा सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com