"घाटी'त बनावट भरती रॅकेट सक्रिय 

योगेश पायघन
शनिवार, 29 जुलै 2017

औरंगाबाद - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) बनावट नियुक्तिपत्र देऊन बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. 

औरंगाबाद - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) बनावट नियुक्तिपत्र देऊन बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. 

विशेष म्हणजे याबाबत खुद्द राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी "घाटी'ला पत्र पाठवून दक्ष राहण्याची सूचना केली. एवढेच नाही, तर यासंबंधी विधानसभेत लक्षवेधीही उपस्थित करण्यात आली असून, असे प्रकार घडले का, किती लोकांची फसवणूक झाली आणि किती जणांना अटक झाली, अशी माहिती घाटीकडून मागविण्यात आली आहे; परंतु याप्रकरणी अद्याप कुणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, याविषयी खल सुरू आहे. 

"घाटी'त एका शिपायाने बनावट सही- शिक्‍क्‍यांचा वापर करून 10 ते 15 उच्चशिक्षित बेरोजगारांना विविध पदांचे नियुक्तिपत्र दिले आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली; परंतु याबाबत अधिष्ठाता कार्यालयाकडे अद्याप कुणीही तक्रार केली नाही. मे महिन्यात पुण्याच्या ससून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशी नियुक्तिपत्रे घेऊन उमेदवार आले होते; पण त्यांचे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे उघड झाले. असाच प्रकार आता "घाटी'त घडला आहे, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. 

तक्रार नाही 
परीक्षेविना नोकरीसाठी काहींनी पाच ते सहा लाख रुपये दिले. मात्र, आता आपली फसवणूक झाली हे त्यांना कळले. पण, गोड बोलून पैसे परत घेऊ, या आशेने अद्याप याबाबत कुणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे रॅकेट चालविणाऱ्या भामट्यांना पकडणे अवघड असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने काहींना पैसे परत 
नियुक्तिपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी नातेवाइकांच्या मदतीने ही बाब "घाटी'तील एका उच्चाधिकाऱ्यांच्या कानी घातली. या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर भामट्याने काही रक्कम उमेदवारांना परत केल्याची माहिती समजली आहे. 

याबाबत वैद्यकीय संचालक कार्यालयाचे पत्र आले आहे. हा प्रकार मेपासून सुरू असल्याचे त्यात नमूद आहे. मात्र, अद्याप कुणीही तक्रार दिली नाही. घाटीत कोणतीही भरती करण्यात आलेली नाही, त्यामुळे कुणाला बनावट नियुक्तिपत्रे मिळाली असल्यास आमच्याकडे तक्रार करा. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी 

Web Title: aurangabad news ghati hospital