स्त्रीरोग, नवजात अर्भक विभागास स्वतंत्र इमारतीसाठी ‘घाटी’त हालचाली

योगेश पायघन
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्त्रीरोग विभाग व नवजात अर्भक विभाग यांच्यासाठी अत्याधुनिक व स्वतंत्र इमारतीच्या प्रस्तावासाठी घडामोडींना वेग आला आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी या विषयात विशेष लक्ष घातले आहे. ९० बेडेड स्त्रीरोग विभाग सध्या २२० बेडची सुविधा देत आहे. स्वतंत्र इमारत झाल्यास ३०० बेडपर्यंत सुविधा देण्यास सज्ज होईल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी ‘सकाळ’ला दिली.

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्त्रीरोग विभाग व नवजात अर्भक विभाग यांच्यासाठी अत्याधुनिक व स्वतंत्र इमारतीच्या प्रस्तावासाठी घडामोडींना वेग आला आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी या विषयात विशेष लक्ष घातले आहे. ९० बेडेड स्त्रीरोग विभाग सध्या २२० बेडची सुविधा देत आहे. स्वतंत्र इमारत झाल्यास ३०० बेडपर्यंत सुविधा देण्यास सज्ज होईल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी ‘सकाळ’ला दिली.

मॅटर्निटी ॲण्ड चाईल्ड हेल्थ केअर विंगच्या स्वतंत्र इमारतीसाठीच्या प्रस्तावाला गती मिळाल्याने ‘घाटी’तील नवजात अर्भक विभाग आणि स्त्रीरोग विभागाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. या इमारतीसाठी २५ ते ३० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी यासंबंधी केंद्र किंवा राज्य शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास हा निधी मिळू शकतो. दरम्यान, पुण्याच्या ससून रुग्णालयात अशाच इमारतीचे काम करीत असलेल्या कन्सल्टन्सी कंपनीने गेल्या आठवड्यात यासंबंधी पाहणी केली आहे. नवजात शिशू अर्भक विभाग आणि स्त्रीरोग विभागाच्या या इमारतीमुळे गरिबांनाही स्वस्तात सुपर स्पेशालिटीचे उपचार करणे शक्‍य होणार आहे. घाटीच्या स्त्रीरोग विभागात वर्षाकाठी सरासरी ३५०० डिलीव्हरी व १६०० सिझर होतात, तर सध्याच्या क्षमतेच्या दुप्पट नवजात शिशूंवर उपचार केले जातात. वाढती रुग्णसंख्या, जागेची कमतरता याअनुषंगाने घाटी प्रशासनाने २५ मे २०१६ रोजी वैद्यकीय शिक्षण संचालकांना २६ कोटी १७ लाख रुपयांचा प्रस्ताव दाखल केला होता. यामध्ये सर्जिकल विभाग, ॲनेस्थेशिया विभाग, ऑर्थोपीडिक विभाग व मॅटर्निटी होमसाठी संचालकांना तळमजला अधिक चारमजली नवीन इमारत सीव्हीटीएस समोरच्या मोकळ्या जागेत बांधण्याचे प्रस्तावित होते. त्यात काही त्रुटी राहिल्याने संचालक कार्यालयाकडून पत्रव्यवहार झाला. त्यानंतर इतर कारण देऊन तत्कालीन अधिष्ठानांनी हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी संचालकांकडे जानेवारी महिन्यात केली होती.

स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख राहिलेल्या डॉ. येळीकर यांनी अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतल्यावर आपला विभागच्या अत्याधुनिकरणाकडे लक्ष घातले आहे. जुन्याऐवजी पुणे येथील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर मॅटर्निटी ॲण्ड चाईल्ड हेल्थ केअर विंग नावाने नव्याने प्रस्ताव तयार करून पाठपुरावा सुरू केला आहे. शवविच्छेदगृहाच्या नूतनीकरनासाठी पाच कोटींच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही इमारत ॲनिमल हाऊसच्या शेजारी बांधण्यात येणार आहे. शवविच्छेदगृहाच्या जागेवर ही नवी इमारत प्रस्तावित करण्याचा मानस आहे. मूत्ररोग, सीव्हीटीएस, ओपीडी, एमआरआय, महाविद्यालय येथून जवळ असल्याने ७१५२ चौरस मीटर जागेवर स्त्रीरोग व बालरोग विभागाची स्वतंत्र पाच मजली इमारतीसाठी प्रस्ताव तयार केला जात आहे. यामध्ये इमारत बांधकाम, विद्युतीकरण, यंत्रसामग्री, फर्निचर आणि पदे यांची संपूर्ण तयारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद यांनी दिली.

या सुविधा मिळणार 
प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतर, स्त्रियांचे इतर आजार, अतिदक्षता विभाग, प्रसूतिगृह, सिझेरियन शस्त्रक्रिया, सिझेरियन कक्ष, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्व निवारण केंद्र, रज्जोनिवृत्तीनंतरच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष यासाठी अत्याधुनिक सुपर स्पेशालिटीची यंत्रसामग्री एकाच इमारतीत उपलब्ध होईल. नवजात शिशूंच्या गुंतागुंतीच्या आजारावरील उपचाराची स्वतंत्र व्यवस्था या इमारतीत असणार आहे. जागेच्या कमतरतेअभावी संकुचलेल्या विभागांचे विस्तारीकरणासही मदत होईल. याशिवाय प्रत्येक मजल्यावर रुग्ण व नातेवाइकांसाठी प्रतीक्षालय, समुपदेशनगृह, स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल.

Web Title: aurangabad news ghati hospital