माता-शिशूंची ताटातूट आता थांबणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) प्रसूत झाल्यावर नवजात लेकराच्या विरहाने मातेच्या मनाची होणारी घालमेल आता थांबणार आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या पुढाकाराने माता व नवजात शिशूंवर एकाच छताखाली उपचार करण्याची योजना आखण्यात आली. तब्बल दोनशे माता आणि ऐंशी नवजात शिशूंवर अतिविशेषोपचारासाठी ‘लक्ष’ योजनेअंतर्गत ३८ कोटींची माता बालसंगोपन विंग उभारण्यात येणार आहे. 

घाटीत प्रसूती झालेल्या माता इमारतीच्या एका टोकाच्या वॉर्डात, तर नवजात शिशू दुसऱ्या कोपऱ्याच्या वॉर्डात हे सर्वांसाठीच गैरसोयीचे होते. त्यामुळे माजी स्त्रीरोग विभागप्रमुख व अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी पुढाकार घेत राज्य व केंद्र शासनाकडे माता व बालसंगोपनासाठी स्वतंत्र ३०० खाटांचा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून पाच कोटींचा निधी घाटीला अंशतः मंजूर झाला आहे. या इमारतीसाठी मेडिसीन विभागाशेजारील जागेची निश्‍चिती तीन महिन्यांपूर्वीच झालेली आहे. सुरक्षित प्रसूतीसाठी शेजारच्या दहा जिल्ह्यांतून घाटीकडे रुग्णांचा ओढा असतो. निधी, औषधांची चणचण व कर्मचाऱ्यांची कमरता असतानाही वर्षभरात सरासरी २० हजार प्रसूती होतात. तर त्यातील  तीन हजारांहून अधिक बालके नवजात शिशू विभागात दाखल होतात. ९० खाटांची मंजुरी असलेला घाटीचा स्त्रीरोगविभाग सध्या २१० खाटांवर उपचार देत आहे. घाटीच्या या दर्जेदार सेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली जात असून, विविध प्रकल्पांसाठी एसओपी व मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचे काम सध्या घाटीत सुरू आहे. या विंगमुळे नवजात शिशूंसह मातांना एकाच छताखाली सुलभ उपचार मिळणार असल्याचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडपा यांनी सांगितले. 

अशा असतील सुविधा
३८ कोटींचा प्रकल्प 
पाच कोटींचा निधी मंजूर
२०० खाटांची होणार व्यवस्था
८० नवजात शिशूंसाठी एनआयसीयू
लेबररूम डिलेव्हरी केअर मिळणार
दुपटीने वाढणार क्षमता 
डिस्ट्रिक्ट अर्ली इन्व्हेंशन सेंटर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कौशल्य प्रशिक्षण केंद्र 

Web Title: aurangabad news Government Medical College