आमिषाला बळी पडून आजीने  गमावले पैसे अन्‌ दागिने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

औरंगाबाद - ""साहेब गरिबांना मदत करतात, तुमचे दागिने, पैसे पिशवीत ठेवा, साहेबांना दिसू देऊ नका, तुम्ही गरीब दिसायला हव्यात'' अशा थापेला बळी पडून महिलेने पदरचे दहा हजार रुपये, मोबाईल व अकरा ग्रॅमचे दागिने गमावले. भामट्यांनी त्यांना गंडवून हा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (ता. 21) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवाजीनगर येथे घडली. 

सुंदरबाई दादाराव गिरे (वय 58) या बाळापूर येथे राहतात. सोमवारी शहानूरमियॉं दर्गा येथील बाजारात त्या खरेदीसाठी आल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास बाळापूरकडे निघाल्या. शिवाजीनगर येथील घुले हॉस्पिटलसमोर त्यांना दोन व्यक्तींनी गाठले. ""आमचे साहेब गरिबांना साड्या व चपला वाटप करीत आहेत. तुम्ही तुमचे दागिने व पैसे पिशवीत ठेवा, तुम्ही गरीब दिसायला हव्यात, ते तुम्हाला मदत करतील'' अशी थाप मारली. यावर विश्‍वास ठेवून सुंदरबाई यांनी स्वत:ची पोत, मणीमंगळसूत्रासह अकरा ग्रॅमचे दागिने पिशवीत ठेवले. सोबत मोबाईल व दहा हजार रुपयेही त्यांनी पिशवीत ठेवून ती कमरेला अडकविली. यानंतर दोघा भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची पिशवी हातचलाखी करून लिलया लंपास केली. यानंतर त्यांनी समोर एक ठिकाण दाखवून महिलेला तेथे पाठविले. दरम्यान दोघांनी विरुद्ध दिशेने पळ काढला. पिशवी गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पिशवी व दोघा भामट्यांची शोधाशोध केली; पण उपयोग झाला नाही. यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलिसांत जाऊन तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी मंगळवारी (ता. 22) गुन्ह्याची नोंद झाली. तत्पूर्वी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिस गोळा करीत आहेत.

Web Title: aurangabad news Grandmother lost money and jewelry